भीषण पुराचा फटका बसलेल्या सांगली जिल्ह्यात पुराचे पाणी काही प्रमाणात ओसरून जनजीवन पूर्वपदावर येत असले तरी पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे. गेल्या आठ दिवसांपासून पिण्यासाठी पुरेसे पाणी नसल्याची व्यथा स्थानिकांनी व्यक्त केली आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.

पुराच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ गावात पिण्याचा पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पुरामुळे गावाशी जोडणारे रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून पिण्याचे पाणी उपलब्ध नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. उद्या ईद असल्याने पुरेसे पिण्याचे पाणीही आमच्याकडे नाही, त्यामुळे ईद कशी साजरी करायची पाण्याशी संबंधीत इतर गोष्टींची व्यवस्था कशी लावायची हा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाल्याचे स्थानिक लोकांनी म्हटले आहे.