रविंद्र केसकर

विठ्ठल आणि श्रीदेवी शरीराने अपंग असलेले दाम्पत्य. मात्र खचून न जाता त्यांनी परिस्थितीशी दोन हात केले. शारीरिक अपंगत्वावर मात करून केशकर्तनाचा व्यवसाय सुरु केला. दोन मुले, आई-वडील अशा सहाजणांच्या कुटुंबाचा चरितार्थ त्यातून चालू लागला. करोनाचं संकट आलं. परिस्थिती अपंग झाली आणि शारीरिक अपंगत्व ओझं वाटू लागलं. दोन्ही पायांनी अपंग असलेल्या विठ्ठल गायकवाड यांचे केशकर्तनालय दोन महिन्यांपासून बंद आहे. काही सामाजिक संस्थांनी हातभार दिल्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न कसाबसा सुटला असला तरी भविष्यातील आर्थिक अडचणी अंगावर धावून येत असल्याची प्रतिक्रिया विठ्ठल गायकवाड यांनी दिली.

उस्मानाबाद शहरापासून आठ किमी अंतरावर असलेल्या वडगाव (सि.) येथील विठ्ठल गायकवाड उच्चशिक्षित आहेत. अर्थप्राप्तीसाठी नोकरी हा केवळ एकमेव पर्याय नाही. त्यामुळे उच्चशिक्षणानंतर खचून न जाता शारीरिक अपंगत्वावर मात करीत त्यांनी केशकर्तनालय सुरु केले. जगण्याचे साधन निर्माण झाले. मोठ्या जिद्दीने सुरु केलेल्या विठ्ठल गायकवाड यांच्या केशकर्तनालयाला ग्राहकांनीही प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. घरभाडे, मुलांचे शिक्षण, दूध, भाजीपाला, कपडालत्ता, आई-वडिलांचा दवाखाना असा सगळा खर्च दोन पायाने उभा न राहू शकणारा विठ्ठल आनंदाने भागवू लागला. वाचनाची आवड, काव्यलेखनाचा छंद, यामुळे तो अनेकांचा मित्र होवून गेला. सर्वकाही सुखात सुरु असतानाच अचानक करोनाचं संकट येऊन धडकलं. १६ मार्च रोजी दुकान बंद करावं लागलं. तेंव्हापासून विठ्ठल गायकवाड परिस्थितीने लादलेल्या अपंगत्वामुळे हतबल झाले आहेत.

या कालावधीत काही सामाजिक संस्थांनी किराणा सामान घरी आणून दिले. त्यामुळे कसेबसे दिवस ढकलले जात आहेत. मुलांचा हट्ट, आरोग्याचे प्रश्न आणि दैनंदिन संसारोपयोगी साहित्याची जुळवाजुळव करताना होत असलेला त्रास सांगताना विठ्ठल गायकवाड भावूक होतात. शारीरिक अपंगत्वाची आपण कधीच काळजी केली नाही. नव्या उमेदीने प्रत्येकवेळी परिस्थितीला सामोरे गेलो. मात्र, परिस्थितीच अपंग बनून समोर आल्यामुळे आता शरीराचे अपंगत्व ओझे वाटू लागले असल्याची भावना विठ्ठल गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. संकटाचे हे दिवस लवकर संपून जावेत आणि स्वकष्टावर कुटुंबात आनंद निर्माण करण्याची परिस्थिती निर्माण व्हावी, ही इच्छा मनाशी बाळगून विठ्ठल गायकवाड चांगल्या दिवसाची प्रतिक्षा करीत आहेत.