कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीसाठी शनिवारी खंडपीठ कृती समितीने जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशव्दारालाच टाळे टोकून पक्षकारांना बाहेर थांबवून धरले. राष्ट्रीय लोकअदालतीवर बहिष्कार टाकत काही काळ काम बंद पाडले. प्रवेशव्दार बंद करतेवेळी पोलिसांनी रोखल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.     
कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीबाबत सरकारच्या काहीही हालचाली न झाल्याने खंडपीठ कृती समितीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यानुसार  शनिवारी राष्ट्रीय महालोकअदालतीवर बहिष्कार टाकण्यात आला होता.
शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आंदोलकांनी न्यायालयाच्या दोनही प्रवेशद्वारावर थांबून पक्षकारांना लोक अदालतीस न जाण्याची विनंती केली. याचा मान राखत पक्षकारांनीही लोकअदालतीपासून अलिप्त राहत रस्त्यावरच थांबून राहिले. सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास आंदोलकांनी न्यायालयाच्या एका प्रवेशद्वारास अचानकपणे टाळे ठोकले. यानंतर आंदोलकांनी आपला मोर्चा न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे वळविला. या ठिकाणी जमलेल्या वकिलांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रवेशद्वार रोखून धरले. आंदोलकांनी सुमारे अध्र्यातासाहून अधिक काळ प्रवेशद्वार रोखून धरल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारास टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने आंदोलक वकील अधिकच आक्रमक झाले. या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत वकिलांना ताब्यात घेतले. आंदोलनाची तीव्रता पाहून जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. जे. जमादार हे स्वत न्यायालयाच्या आवारात येऊन आंदोलनाची माहिती घेत होते. सर्व वकिलांना पोलीस गाडीतून लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. काही वेळाने त्यांना सोडून देण्यात आले. दरम्यान वकिलांनी केलेल्या विनंतीप्रमाणे पक्षकारांनीही लोकअदालतीपासून अलिप्त राहणे पसंत केले.
लोकअदालतीमध्ये पक्षकारांना न्याय मिळत नाही अथवा कोणत्याही प्रकारची तडजोड होत नाही. लोकअदालती या केवळ दिखाऊपणा व वेळ व पसा खर्च करण्याचे काम करतात असा आरोप आज खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. विवेक घाटगे यांनी केला. ते म्हणाले, एकीकडे लोकअदालत भरून पक्षकारांना न्याय देत असल्याचे भासवायाचे मात्र कोल्हापूरच्या खंडपीठाचा प्रश्न टोलवत राहायचा ही दुटप्पी भूमिका आहे. कोल्हापुरात खंडपीठ झाल्यास लोकअदालतीची गरज भासणार नाही यामुळे लोकअदालतीपेक्षा खंडपीठाची मागणी पूर्ण करावी अशी मागणी घाटगे यांनी केली.