तांत्रिक बाब समोर करून बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करत माकपच्या जिल्हा कमिटीने गुरुवारी (दि. ३१) पाथरीतील हैदराबाद बँक व इंडिया बँकेस टाळे ठोकले. तसेच सेलू कॉर्नरवर रास्ता रोको आंदोलन केले.
पावसाअभावी शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत. पाथरी तालुक्यात गोपेगाव, सारोळा व डोंगरगाव येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी बँकांनी कर्जपुरवठा केला पाहिजे. परंतु बँका तांत्रिक बाब समोर ठेवून कर्ज देण्यास टाळाटाळ करतात, असा आरोप माकपने केला. कर्जाचे पुनर्गठण करून सरसकट सर्व शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप करावे, राज्य सरकारने कर्जावरील व्याज माफ केले आहे. परंतु बँकांनी वसूल केलेले व्याज परत द्यावे, केंद्र सरकारच्या ३ टक्के व्याज सवलतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी आदी माागण्यांसाठी माकपने पाथरीत आंदोलन केले.
माकपचे जिल्हा सरचिटणीस कॉ. विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून सेलू कॉर्नरवर रास्ता रोको करण्यात आले. मोर्चा बँकेसमोर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी बँकेस टाळे ठोकले. अखेर दोन्ही बँकांच्या व्यवस्थापकांनी कर्ज वाटपाचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. या संदर्भात उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. टाळे ठोकल्याप्रकरणी सायंकाळी माकप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आंदोलनात कॉ. दीपक लिपणे, िलबाजी कचरे, शेषराव कोल्हे, रमेश साठे, दिगांबर पौळ, अशोक हारकळ आदी सहभागी झाले होते.