महाराष्ट्रात चारही कृषी विद्यापीठांत लागू होणारे ‘भरती मंडळ’ रद्द करण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र अ‍ॅग्रिक्रॉस स्टुडंट असोसिएशनने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कुलगुरू कार्यालयासह सर्व महाविद्यालयांना कुलूप ठोकले. या आंदोलनाला विद्यापीठातील सर्व कर्मचारी संघटनेचा पाठिंबा मिळाला आहे.
महाराष्ट्र कृषी अनुसंधान परिषदेचे कृषी सेवा निवड मंडळ बरखास्त करणे, वर्ग २ आणि ४ पर्यंतच्या पदाची निवड, पदोन्नती, बदली इत्यादी अधिकारी संबंधित विद्यापीठांच्या कुलगुरूंना देण्यात यावे, विद्यापीठातील नोकरभरती ही विद्यापीठस्तरावर तात्काळ करण्यात यावी, चारही कृषी विद्यापीठांतील कुलगुरूंना पूर्वीप्रमाणे सरळ सेवेने भरती व पदोन्नतीचे अधिकार देण्यात यावेत, महाराष्ट्र कृषिशिक्षण व संशोधन परिषद त्वरित बरखास्त करून कुलगुरूंनाच अधिक अधिकार प्रदान करण्यात येऊन विद्यापीठस्तरावर निर्णय घेण्याबाबत अधिकारात सुधारणा करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र अ‍ॅग्रिक्रॉस स्टुडंट असोसिएशनने १ जूनपासून विद्यापीठात बंद पुकारला आहे. या संदर्भात त्यांनी राज्यपालांना निवेदन पाठवले आहे. १ जूनपासून विद्यापीठातील अनेक कार्यालये बंद आहेत, परंतु याबाबतचा निर्णय अद्यापही झाला नसल्याने मंगळवारी (दि. १७) असोसिएशनच्या कार्यकर्त्यांनी कुलगुरूंच्या कार्यालयासह विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांना टाळे ठोकले. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला मराठवाडा कृषी विद्यापीठ कर्मचारी संघ आणि कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने जाहीर पाठिंबा दिलेला आहे. राज्यपालांना दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र अ‍ॅग्रिक्रॉस असोसिएशनचे अध्यक्ष तुकाराम कदम, उपाध्यक्ष विजय सावंत, अनिल आडे, तर कर्मचारी संघाचे अध्यक्ष प्रा. दिलीप मोरे, सरचिटणीस ज्ञानोबा पवार, कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष डॉ. गजेंद्र लोंढे, प्रा. ए. एम. कांबळे यांची स्वाक्षरी आहे.