शहरातील पाणीपुरवठय़ाचा विस्कळीतपणा बुधवारी पुन्हा वाढला. निम्म्याअधिक शहरात पाण्यासाठी ओरड सुरू असून, एमआयएमच्या नगरसेवकांनी बुधवारी तीव्र आंदोलन करीत वॉटर युटिलिटी कंपनीच्या कार्यालयास कुलूप ठोकले. त्यामुळे शहरातील विस्कळीत पाणीपुरवठय़ाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.
एका बाजूला वॉटर युटिलिटी कंपनीबरोबर केलेल्या करारावर सत्ताधारी भाजपकडूनच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. उपमहापौर प्रमोद राठोड यांनी विस्कळीत पाणीपुरवठय़ाकडे आयुक्तांनी लक्ष द्यावे, अशी विनंती केली. मात्र, प्रशासनाकडून फारसे कडक धोरण स्वीकारले जात नसल्याचे चित्र आहे. विस्कळीत पाणीपुरवठय़ास खंडित वीजपुरवठा कारणीभूत असल्याचे वॉटर युटिलिटी कंपनीचे अधिकारी सांगातात. जनसंपर्क अधिकारी राहुल मोतियाले यांनी सांगितले, की नक्षत्रवाडी येथे वीजपुरवठा खंडित झाल्याने काही भागांत योग्य दाबाने पाणी पोहोचत नाही. किती भागात बुधवारी पाणी पोहोचू शकले नाही, हे सांगता येणार नाही. मात्र, पाणीपुरवठा विस्कळीत होऊ शकतो, हे आम्ही कळवले होते.
बुधवारी शहागंज, सिडको व हडको भागात पाणी न आल्याने नागरिकांची ओरड सुरू झाली. या पाश्र्वभूमीवर एमआयएम नगरसेवकांनी नागरिकांच्या तक्रारीचे निरसन करण्यासाठी सिडको येथील पाण्याची टाकी गाठली. मात्र, समस्या मिटणारच नाही, असे लक्षात येताच एन १ भागातील वॉटर युटिलिटी कंपनीचे कार्यालय गाठले. संतप्त नगरसेवकांनी कंपनीच्या कार्यालयास कुलूप ठोकले. दरम्यान, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना बोलावल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.