राजस्थानमधील कोटा येथे अडकून पडलेले ३३ जण अखेर बुधवारी सकाळी रायगड जिल्ह्यात दाखल झाले. यात २७ विद्यार्थी आणि सात पालकांचा समावेश आहे. खारघर येथील ग्रामविकास भवन येथे वैद्यकीय तपासणी करून सर्वांना घरी पाठविण्यात आले. याचबरोबर त्यांना घरी अलगिकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हे सर्व विद्यार्थी आयआयटी आणि मेडीकल कॉलेजच्या प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी राजस्थानमधील कोटा येथे गेले होते. मात्र टाळेबंदीमुळे सर्व जण तिथेच अडकून पडले होते. महिन्याभरापासून अडकून पडलेल्या या विद्यार्थ्यांना परत आणण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला होता. यानुसार जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कोटा येथील जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून मुलांना परत आणण्याबाबत नियोजन केले. अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे यांनी संबधित विभागांशी बोलून प्रशासकीय तयारीचा आढावा घेतला. यानंतर मंगळवारी सकाळी या सर्वांना घेऊन बस रायगडच्या दिशेने रवाना झाल्या. परतीच्या मार्गावर उज्जैन आणि धुळे येथे विद्यार्थ्यांसाठी फुड पॅकेटची व्यवस्था करण्यात आली होती.

आज पहाटे हे विद्यार्थी खारघर येथील ग्राम विकास भवन येथे दाखल झाले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यानंतर तिथे सर्व विद्यार्थ्यांची डॉक्टरांकडून यावेळी तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीनंतर सर्वांना आपआपल्या घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. मात्र सुरक्षितेची बाब म्हणून सर्व विद्यार्थ्यांना पुढील 14 दिवस घरातच अलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दीड महिना आम्ही प्रचंड दडपणात होतो –
टाळेबंदीमुळे आम्ही अडकून पडलो होतो. तेथील प्रशासनाने आमची चांगली व्यवस्था केली होती. मात्र घराच्या ओढीने, धीर खचत होता. घालमेल वाढली होती. दीड महिना प्रचंड दडपणात आम्ही होतो. ते घरी परत आल्याने हे दडपण दूर झाले आहे. असे राजस्थानमधून परत आलेल्या श्रिया हिने सांगितले.

सर्वांना घरीच राहण्याचा सल्ला –
सर्व विद्यार्थी आणि पालकांना आज विशेष बसची व्यवस्था करून परत आणण्यात आले. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. नंतरसर्वांना आपआपल्या घरी पाठविण्यात आले आहे. सर्वांना आपआपल्या घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगीतले.