राज्यात सध्या लॉकडाउन आहे. देशातील लॉकडाउन संपण्यासाठी आता अवघे दोनच दिवस शिल्लक आहे. मात्र, हा लॉकडाउन लागू झाल्यानंतर एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ होता मेंढपाळांचा. बुलढाणा शहराजवळ असलेल्या एका गावाच्या माळरानावर २० मेंढपाळ मेंढ्यासह अडकले होते. त्यांचे सर्वच रस्ते बंद झाले होते. मदतीची मागणी करणारा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी तात्काळ दखल घेत, मेंढपाळांना मदत पोहोचवली.

महाराष्ट्रात आणि देशात लॉकडाउन लागू झाल्यानंतर लक्ष्मण खेडकर यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. लॉकडाउनमुळे बुलढाण्यामधील उमरे गावाच्या रानात काही मेंढपाळी मेंढ्या घेऊन आले होते. मात्र, लॉकडाउन लागल्यानं ते अडकले. बकऱ्या, गायी, बैल, कुत्री, मेंढ्या असं पशुधन असताना त्यांच्याकडील खाण्याचं साहित्य संपलं होतं. जनावरांनाही खायला चारा शिल्लक राहिला नव्हता. या मेंढपाळांपैकी एकानं फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदतीची विनवणी करणारा एक व्हिडीओ पोस्ट केला.

हा व्हिडीओ मुंबईतील दिग्दर्शक, निर्माते महेश टिळेकर यांनी पाहिला. त्यांनी बुलढाण्याच्या आमदारांशी फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी संपर्क न झाल्यानं टिळेकर यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. संजय राऊत यांच्याशी संपर्क झाला. त्यानंतर टिळेकर यांनी राऊत यांना संपूर्ण परिस्थिती सांगितली. राऊत यांनी टिळेकर यांना मदतीचं आश्वासन दिलं. त्यानंतर काही वेळातच यंत्रंणा कामाला लागली. मेंढपाळांनी संपर्क करण्यात अडचणी येत असल्यानं थेट महिनाभराचं धान्य आणि इतर साहित्य त्यांना त्यांच्या ठिकाणी नेऊन देण्यात आलं.