Maharashtra Lockdown: करोनाचं संकट अद्यापही पूर्णपणे टळलं नसल्याने ठाकरे सरकारने लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंबंधी मुख्यमंत्री निर्णय घेत अधिकृत जाहीर करतील अशी माहिती दिली होती. त्याप्रमाणे १ जूनपर्यंत लॉकडाउन वाढवत असल्याचा अधिकृत आदेश प्रसिद्ध करत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यानेच सध्या लागू असलेले कठोर निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाकरे सरकारने निर्बंध अजून कठोर केले असून बाहेरुन राज्यात येणाऱ्या लोकांना आरटीपीआसीरआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारे प्रवेश करणाऱ्या व्यक्तीकडे निगेटिव्ह आरटीपीआसीरआर टेस्ट रिपोर्ट असं बंधनकारक असून प्रवेश कऱण्याच्या ४८ तास आधी हा रिपोर्ट काढलेला असावा असं आदेशात नमूद आहे. दरम्यान देशातील कोणत्याही भागातून राज्यात येणाऱ्यांसाठी आधीचे नियम लागू असतील.

दरम्यान कार्गो कॅरिअरमध्ये चालक आणि क्लिनर अशी दोघांनाच परवानगी असणार आहे. जर हे कार्गो कॅरिअर बाहेरच्या राज्यातून प्रवेश करत असतील तर निगेटिव्ह आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट बंधनकारक असून ४८ तासांच्या आत तो काढलेला असावा.

स्थानिक बाजारपेठा तसंच एपीएमसीवर पालिकांनी लक्ष ठेवून करोनाच्या नियमांचं पालन होत आहे की नाही याची खबरदारी घेण्याची जबाबदारी असेल. जर एखाद्या ठिकाणी नियमांचं पालन होत नसेल किंवा परिस्थिती हाताळणं शक्य होत नसेल तर स्थानिक प्रशासन तिथे निर्बंध वाढवण्याचा किंवा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतं.

औषधं आणि करोनाशी संबंधित सामग्रीसाठी प्रवास करावा लागणाऱ्या विमानतळ आणि बंदरावरील कर्मचाऱ्यांना लोकल, मोनो आणि मेट्रोने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

एखाद्या ठिकाणी निर्बंध वाढवायचे असल्यास स्थानिक प्रशासनाकडे हक्क देण्यात आले असून यासाठी निर्बंध लागू करण्याच्या ४८ तास आधी नोटीस द्यावी असं सागंण्यात आलं आहे.

राज्यातील करोनाचा उद्रेक रोखण्यासाठी राज्यात १४ एप्रिलपासून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आधी हे निर्बंध १ मेपर्यंत होते व नंतर १५ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत शनिवारी संपत असल्याने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. या निर्बंधामुळे राज्यात करोनाची साथ नियंत्रणात आली असून राज्याचा रुग्णवाढीचा दर कमी झाला आहे. १० ते १५ जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा कमी झाला असला तरी आजूनही काही जिल्हयात बाधितांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सध्याचे निर्बध आणखी १५ दिवस वाढविण्याची एकमुखी मागणी बहुतांश मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. त्यानुसार लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lockdown extended in maharashtra till 31st may sgy
First published on: 13-05-2021 at 11:51 IST