राज्यातील विविध भागात लॉकडाउनमुळं अडकून पडलेल्या लोकांना त्यांच्या जिल्ह्यातल्या गावी पोहोचवण्यासाठी १० हजार एसटी बस सोडण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे अशा लोकांसाठी हा एसटीचा प्रवास मोफत दिला जाणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टिवार यांनी दिली.

वडेट्टिवार म्हणाले, “महाराष्ट्रात अडकलेल्या लोकांना आपापल्या जिल्ह्यातील गावी पोहोचवण्यासाठी मदत व पुनर्वसन विभागाकडून एसटी महामंडळाला निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. पुढच्या दोन-तीन दिवसांत या माध्यमातून जवळपास १० हजार बसेस सोडून या अडकलेल्या लोकांना त्यांच्या गावी सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”

आणखी वाचा- महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केली चिंता; उद्धव ठाकरे यांच्यासोबत करणार चर्चा

“याबाबत संबंधित जिल्हा प्रशासनाची माहिती, स्क्रिनिंगचं काम, गरज पडल्यास करोनाची लक्षणं आढळून आलेल्यांना संस्थात्मक क्वारंटाइन करणं, या बाबींची चर्चाही झाली आहे. त्यानंतर पुढच्या चार-पाच दिवसांत मुंबई, पुणे किंवा इतर जिल्ह्यांमध्ये अडकलेले विद्यार्थी, नातेवाईकांकडे गेलेले लोक, मजूर या सर्वांना त्यांच्या गावापर्यंत मोफत पोहचवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या लोकांना तिकीटाचा कुठलाही भुर्दंड पडणार नाही, अशी भुमिका घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन विभागाला केल्या आहेत,” अशी माहितीही वडेट्टिवार यांनी दिली.

आणखी वाचा- नालासोपारा : पराराज्यात जाण्याचा अर्ज भरण्याचा वादातून कुटुंबावर हल्ला

दरम्यान, महाराष्ट्रातून बाहेरच्या राज्यातील लोकांना काँग्रेस पक्षाच्यावतीनं त्यांच्या गावी मोफत पाठवलं जाणार आहे. तर महाराष्ट्रातील लोकांना त्यांच्या गावापर्यंत शासनाच्या माध्यमातून मोफत पोहोचवलं जाणार आहे. पुढच्या पाच-सहा दिवसांत प्रत्येक अडकलेला नागरिक आपल्या घरापर्यंत सुरक्षित जाईल, अशी ग्वाही देखील यावेळी वडेट्टिवार यांनी दिली.