News Flash

लॉकडाउन तर वाढवला पण कष्टकऱ्यांनी कसं जगायचं, त्यांच्यासाठी सरकार काय करणार? – दरेकर

आघाडीतल्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या मागण्यांनाही हे सरकार पाने पुसणार का? असा देखील सवाल केला आहे.

संग्रहित

”महाराष्ट्रात लॉकडाउन १ जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला. पण लॉकडाउन वाढवण्यापूर्वी छोटे व्यावसायिक आणि कष्टकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी भूमिका भाजपाच्या वतीने वारंवार मांडली गेली होती, मात्र सरकारने याचा विचार न करता लॉकडाउन जाहीर केला. मागच्या लॉकडाउनमध्ये जे पॅकेज सरकारने जाहीर केलं तेही अजून सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेलं नाही. लॉकडाउन करत असताना कष्टकरी वर्गांसाठी मदत करावी, अशी मागणी भाजपा सातत्याने करत असताना आता महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी सुद्धा हीच मागणी पंतप्रधानांकडे केली आहे. घटक पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांच्या भावना सुद्धा सरकार समजून घेणार नाही का?” असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी सरकारला केला आहे.

राज्य सरकारने लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर दरेकर माध्यमांशी बोलत होते. कोणतही नियोजन न करता लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे कष्टकरी वर्ग आणखी अडचणीत सापडला आहे, त्यांच्यासाठी सरकार काय करणार? अस देखील प्रश्न प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

“दिवसेंदिवस पुढे ढकलल्या जाणाऱ्या लसीकरणाला महाविकास आघाडी सरकारच जबाबदार” –
”केंद्र सरकारकडून लशी मिळत नाही, या दिशाभूल करणाऱ्या कारणावरून १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण सरकारने पुढे ढकलले. खरं तर या लसी मिळवण्याची जबाबदारी राज्य सरकारची होती, पण महाविकासआघाडी सरकार आपल्या जबाबदारीपासून पळ काढत असून, अशा प्रकारच्या क्लुप्त्या करत आहे. आतापर्यंत लसी राज्य सरकारने मिळवायला हव्या होत्या. पण अजूनही सरकार केवळ पत्राचाराचा खेळ खेळत आहे. सरकारने हातात तयार ठेवलेला चेक कुठे अडकला ? इतर राज्यांनी लसी बुक केल्या, नोंदणी केली, पैसेही भरले आणि महाराष्ट्राचे सरकार अजून केंद्राला पत्र पाठवण्यात अडकलं आहे. राज्यातील लसीकरण हे दिवसेंदिवस पुढे जात असून महाविकास आघाडी सरकारच त्याला जबाबदार आहे.”, असा आरोप दरेकर यांनी केला.

“करोनाची खरी परिस्थिती लपवण्यासाठी आणि प्रतिमा संवर्धनासाठी ठाकरे सरकारचा कोट्यवधींचा खर्च” –
”ठाकरे सरकार कोरोनाची खरी परिस्थिती लपवण्यासाठी आणि आपल्या प्रतिमा संवर्धनासाठी जनतेसमोर खोटं चित्र उभारून कोट्यवधीचा खर्च करीत आहे. त्यामुळे ठाकरे सरकारची पीआर एजन्सी नेमकं काय काम करतेय, असा सवाल करून याबाबतची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करावी”, अशी मागणीही दरेकर यांनी केली आहे.
तसेच, सरकार प्रसार माध्यमांमार्फत, जाहिरातीच्या माध्यमातून करोना प्रादुर्भाव रोखण्यात येत असल्याचे भासवत असून स्वतःचं कौतुक करण्यासाठी जनतेसमोर खोटं चित्र उभारले जात आहे. पण आजच्या परिस्थितीत ते अनावश्यक आहे. आदिवासी विभागात धुळे, नंदूरबार, पालघर, गडचिरोली येथे उपचारांसाठी प्रतिसाद मिळत नाही, तिथे प्रबोधनावर, जाहिरातींवर खर्च करण्याची आवश्यकता असताना सरकार मात्र स्वतःची पब्लिसिटी करण्यासाठी जनतेच्या कष्टाचा पैसा खर्च करीत असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला आहे.

“ग्लोबल टेंडरबाबत सरकारची बनवाबनवी”-
”सरकार ग्लोबल टेंडर काढण्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागण्यासाठी पत्र लिहिणार आहे, असे सांगितले गेले. पण एकीकडे गेल्या आठवड्यापासून ग्लोबल टेंडरची प्रक्रिया केल्याचे हेच सरकार सांगत होते. मुंबई महापालिकेने तर तसे जाहीरही केले आहे. आघाडी सरकार ग्लोबल टेंडरकरता केंद्राकडे परवानगी मागते आहे आणि त्याचवेळी महापालिका स्वतःच मंजुरी देऊन मोकळी होते आहे ? यांतलं गौडबंगाल काही कळत नाही.”, अशी टीका दरेकर यांनी केली.

“लसीकरणाबाबत सरकारचा बेधुंद कारभार उघड”-
”४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केंद्र सरकार करेल आणि १८ ते ४५ वर्षामधील नागरिकांचे लसीकरण राज्य सरकारला करायचे आहे. यासाठी लस उत्पादित कंपन्याकडून ५० टक्के लसी खरेदी करण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. एवढे सगळे स्पष्ट असताना केवळ संभ्रम निर्माण करण्याचे काम राज्य सरकार करत आहे. आता पहिला डोस ४५ वर्षांवरील नागरिकांना दिला आहे, त्यांना दुसरा डोस देण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकार सांगते, २० लाख डोस पाहिजेत, त्यातील १० लाख उपलब्ध आहेत. म्हणजे ना धड १८ ते ४४ साठी न्याय ना धड ४५ वरील लोकांना न्याय, असा सरकारचा बेधुंद कारभार सुरू आहे.” अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली.

“मंत्र्यांनी बॉलिवूड कलाकारांना बेकायदेशीरपणे लसी विकल्या”-
‘सरकारमधील मंत्र्यांनी बॉलिवूड कलाकारांना अवैध पद्धतीने लसी विकल्याचा गंभीर आरोप आज दरेकर यांनी केला. सांगली, साताऱ्यासारख्या जिल्ह्यांना साडे सहा लाख लसी आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांना फक्त २ लाख लसी हे सरकार देते, यात कोणती समानता आहे ? त्यामुळे सरकारने लसीचं नेमकं काय केलं, याचा लेखाजोखा जनतेला द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 7:00 pm

Web Title: lockdown has been increased but how will the working people live what will the government do for them darekar msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Maharashtra Lockdown: “मुंबई मॉडेल इतकं यशस्वी आहे तर मुंबईकरांना अजून १५ दिवसांची शिक्षा कशासाठी?”
2 “नमामी गंगेचे आज शवामी गंगेत रूपांतर” ; काँग्रेस खासदार बाळू धानोरकरांची मोदी सरकारवर टीका!
3 “शिवसेना भवनातून फोन; करिना, कतरिना, दिशा पटानी यांच्याशी लाखोंचा व्यवहार,” नितेश राणेंचा गंभीर आरोप
Just Now!
X