प्रशांत देशमुख

झोपडपट्टीतील मुलांसाठी चालविल्या जाणाऱ्या ‘फुटपाथ स्कूल’च्या गरीब विद्यार्थ्यांकडून टाळेबंदीच्या काळातही आपापल्या परीनं कुटुंबाला मदत करण्याचे अनोखे उदाहरण पुढे आले आहे.

शहरातील आर्वीनाका परिसरात मोहित सहारे हे युवा सामाजिक कार्यकर्ते अत्यंत गरीब मुलांसाठी ‘फुटपाथ स्कूल’ नामक उपक्रम चालवतात. ज्यांची परिस्थिती मुलांना शिकविण्यासारखी नाही अशा कुटुंबातील भटकणाऱ्या मुलांना या शाळेत प्रवेश दिला जातो. इथ प्राथमिक स्वरूपाचं शिक्षण त्यांना दिलं जातं. करोनाच्या पार्श्वभूमीवर या शाळेतील अन्य उपक्रम बंद पडले आहेत. त्यामुळे मुलं आपापल्या झोपड्यांकडे पांगली आहेत.

ज्या कुटुंबात आई-वडिलांच्या जीवावरच दोन वेळची चूल पेटते, अशा कुटुंबाचा रोजगार आता हरविला गेला आहे. विवंचनेत असणाऱ्या अशा काही कुटुंबांना धान्याची मदत झाली. मात्र, रोख रक्कम हाती नसल्याने या कुटुंबापुढे समस्या आहेच. अशाच एका कुटुंबातील एक दहा वर्षाचा मुलगा नागेश हा कुटुंबाला हातभार लावण्यासाठी फळांची हातगाडी चालवत आहे. त्याच्या वडिलांची लस्सीची बंडी बंद आहे. दुपारपर्यंत ही फळं विकून जमलेले पैसे तो आईच्या हातात देतो. अत्यंत बोलकं असं हे उदाहरण शिक्षक सहारे यांनी निदर्शनास आणलं.

त्याचबरोबर इतर दोन मुलं आपल्या घराच्या जवळपास भाजी विकतात. या मुलांना झालेली जबाबदारीची जाणीव महत्वाची आहे. अशांना नागरिकांनी मदत केली पाहिजे, अशी अपेक्षा सहारे यांनी लोकसत्ताशी बोलतांना व्यक्त केली. ‘फूटपाथ स्कूल’ची उर्वरित मुलं घरीच कुटुंबाला मदत करीत आहेत. त्यांच्या या शाळेला मान्यता नाही. पण किमान मुळाक्षरे गिरवून तरी या मुलांना वाचता यायला हवं, हा या शाळेचा प्रामाणिक हेतू आहे.