प्रवाशांअभावी वाडा बस आगाराच्या ७० टक्के बसफेऱ्या रद्द

वाडा :  दुसऱ्या टप्प्यातील करोना या संसर्गजन्य महामारीला आळा बसावा म्हणून १५ एप्रिलपासून मोठ्या प्रमाणात निर्बंध ठेवून शासनाने टाळेबंदी सुरू केली आहे. या टाळेबंदीचा मोठा फटका येथील एसटी बससेवेला बसला आहे.

अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सुविधा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच अत्यंत जरुरीच्या कामासाठीच घराबाहेर पडा असे वारंवार येथील नागरिकांना सूचित केल्याने नागरिकही बाहेर पडत नाहीत. याचा फटका व्यापारी वर्गाला बसला आहेच, पण एसटी बसमध्ये बसण्यासाठी प्रवाशीही मिळत नसल्याने वाडा आगाराला ७० टक्के बसफेऱ्या बंद कराव्या लागल्या आहेत.

एकेकाळी ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली लालपरीची प्रवाशांनी साथ सोडल्याने ही लालपरी चांगलीच अडचणीत आली आहे. करोनामुळे पुकारलेली टाळेबंदीचा मोठा फटका एसटी बस सेवेला सहन करावा लागत आहे.

गेल्या आठवड्यापर्यंत वाडा बस आगारातून २६ शेड्युलच्या (वेळापत्रक) माध्यमातून दररोज १६० ते १६५ बसफेऱ्या सुरू होत्या. मात्र करोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या संख्येने सकारात्मक रुग्ण आढळून येऊ लागल्याने शासनाने अनेक निर्बंध घातले आहेत. याचा परिणाम एसटी बसमधील प्रवाशी घटल्याने रिकाम्या बस फिरताना दिसत आहेत.

वाडा आगाराने आजपासून (१५ एप्रिल) येथील २६ वेळापत्रकातील जवळपास १६ वेळापत्रके बंद करून १२० ते १२५ बसफेऱ्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या १० वेळापत्रके सुरू असून ४० ते ४५ बस फेऱ्या सुरू आहेत. यामधील बहुतांशी फेऱ्या ह्या शहरी भागात जाणाऱ्या आहेत. ग्रामीण भागातील ८५ टक्के फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.

येथील बस आगारातील अनेक कर्मचाऱ्यांना कामगिरी नसल्याने रजेवर जाऊ इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांची तात्काळ रजा मंजूर करण्यात येत आहे. काही कर्मचारी मात्र अन्य रोजगाराची दुसरी व्यवस्था नसल्याने या करोनाच्या धोकादायक परिस्थितीतही आपली चोख कामगिरी बजावत आहेत. या स्थितीचा एसटीला मोठा फटका बसला आहे.

प्रवाशांचा प्रतिसाद आणखीन कमी झाला तर, मोठ्या प्रमाणावर होत असलेला तोटा रोखण्यासाठी अजून काही फेऱ्या बंद कराव्या लागतील. – मधुकर धांगडा, आगार व्यवस्थापक, वाडा आगार.

 

ग्रामीण भागातील बस फेऱ्या सरसकट बंद करू नयेत, दिवसभरात प्रत्येक मार्गावर दोन फेऱ्या तरी सुरू ठेवाव्यात. – वाडा तालुका प्रवासी संघटना.