करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने दिरंगाई केल्याचा सूर राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातून उमटू लागला आहे. त्याचबरोबर लॉकडाउन लागू करण्याआधी केंद्र सरकारनं नियोजन करायला हवं होतं. लोकांना वेळ द्यायला हवा होता, अशी टीका होऊ लागली आहे. देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसनं टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर दुसऱ्यांदा जनतेला संबोधित करताना लॉकडाउनची घोषणा केली. केंद्र सरकारनं देशातील नागरिकांना कोणतीही कल्पना न देता लॉकडाउनची घोषणा केल्यामुळे गोंधळ उडाला आहे, अशी टीका सुरू झाली आहे. विशेषतः दिल्लीत कामानिमित्त आलेले कामगार गावी परतत असून त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात हा निर्णय घेतल्याबद्दल माफी मागितली होती.

या मुद्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे. ‘मोदीजींना स्वतःबद्दल गैरसमज आहेत आणि देश समजला नाही! आत्ममग्न व्यक्ती स्वतःला समजू शकत नाही आणि देश समजायला द्रवणारे हृदय लागते. त्यामुळे माफी मागून काहीही फरक पडणार नाही,’ अशी टीका सावंत यांनी केली आहे.

काय म्हणाले होते मोदी ?

रविवारी झालेल्या मन की बात कार्यक्रमात मोदींनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाउनच्या निर्णयाबद्दल भूमिका मांडली. ‘करोनाचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने देश लॉकडाउन करावा लागला. यासाठी मी देशवासीयांची माफी मागतो. अनेक लोकांच्या गैरसोयी होत आहेत. हातावरचे पोट असलेले लोक मोठ्या कठीण प्रसंगाला सामोरे जात आहेत. अनेक कष्टकरी, कामगार यांना त्रास सहन करावा लागतो आहे. त्यासाठी मी देशवासियांची माफी मागतो,’ असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं.