राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असली, तर करोना संक्रमणाचा प्रसार कमी झालेला नाही. करोना रुग्णवाढ कायम असून, मृतांची संख्या वाढत असल्यानं काळजीत वाढ झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून कडक लॉकडाउनच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, पंतप्रधानांनी लॉकडाउन शेवटचा पर्याय म्हणून वापरण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे राज्य सरकार काय करणार याकडे लक्ष लागलं होतं. पण, राज्यात कडक लॉकडाउन लागणार असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी करोना उपाययोजनासह ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरच्या तुटवडा संपवण्यासंदर्भातील माहिती दिली. टोपे म्हणाले,”पंतप्रधानांनी लॉकडाउन शेवटचा पर्याय असल्याचं म्हटलं असलं, तरी महाराष्ट्रातील सध्याच्या अशंतः लॉकडाउनच्या काळातील जी परिस्थिती आहे, ज्यामध्ये उपलब्ध बेड, उपलब्ध ऑक्सिजन, उपलब्ध मेडिसीन, उपलब्ध डॉक्टर यांचा ८० ते ९० टक्क्यांपर्यंत वापर होत आहे. त्यामुळे वाढत असलेली संख्या लक्षात घेऊन ही साखळी तोडण्यासाठी लॉकडाउनचा वापर केला जातोय.. जगातही साखळी तोडण्यासाठी वापर होतोय. म्हणून संपूर्ण मंत्रिमंडळाने ही भूमिका घेतली की, लॉकडाउन लावून साखळी तोडावी लागेल. त्यामुळे अधिक कडक निर्बंध लावण्यात येतील. लॉकडाउन करणं गरजेचं आहे. त्याची नियमावली जाहीर होईल. मुख्यमंत्री त्याची घोषणा करतील,” असं टोपे म्हणाले.

“या लॉकडाउनमध्ये रेल्वे, बस बंद राहणार नाही. जिल्हाबंदी नसेल, पण नियम कडक केले जातील. कुणालाही विनाकारण या एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही. ठोस कारण असल्याशिवाय दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही. चौकशी केली जाईल,” असं टोपे यांनी स्पष्ट केलं. राज्य सरकारने लॉकडाउनपेक्षा आरोग्य सुविधा वाढविण्याच्या मुद्द्यावर टोपे म्हणाले, “राज्यांमध्ये आधी हजारांमध्ये बेड होते. ते आता लाखांमध्ये गेले आहेत. देशात कोणत्याही राज्यात चाचण्या करण्याच्या सुविधा नसतील इतक्या महाराष्ट्रात आहेत. अनेक चांगले निर्णय घेण्यात आलेले आहेत. ग्रामीण आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे,” असं टोपे यांनी सांगितलं.

लसीकरणावर जोर देणार

“लसीकरणासाठी लागणारा निधी सरकारकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनीही तसं सांगितलं आहे. इतर कामं थांबवून लसीकरणाला वेग देऊ, असं ते म्हणाले आहेत. महाराष्ट्रातील रुग्णसंख्या खूप वाढली आहे. मृत्यूही जास्त आहे. त्यामुळे अधिक लसींचा पुरवठा करण्यात यावा, अशी विनंती केंद्राकडे करण्यात आलेली आहे. अधिकचा साठा पुरवल्यास दूरच्या भागातही लसींचा सुरळीत पुरवठा करता येईल,” असं टोपे यांनी म्हटलं आहे.

हवेतून ऑक्सिजन निर्माण केला जाणार

ऑक्सिजनच्या टँकरची जिल्ह्यांजिल्ह्यात पळवापळवी सुरू असल्याच्या मुद्द्यावर बोलताना टोपे म्हणाले, “ज्या जिल्ह्याचा टँकर त्या जिल्ह्यातच गेला पाहिजे. ऑक्सिजन पुरवठ्याची मागणी करायची असेल, तर तशी समितीकडे करावी लागेल. परस्पर निर्णय जिल्ह्याधिकाऱ्यांना घेता येणार नाही. सचिवांना तशी सूचना केली आहे. हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारे प्लांट ज्या कंपन्यांनी उभे केले आहेत. ते ताब्यात घेऊन ते सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहे. यामुळे लिक्विड ऑक्सिजनवरील ताणही कमी होईल,” अशी माहिती टोपे यांनी दिली.

१ लाखांपर्यंत रेमडेसिवीर पुरवठा 

“मुख्यमंत्र्यांनी रेमडेसिवीर कंपन्यांच्या मालकांशी चर्चा केली. ६० रेमडेसिवीर वाईल्स मिळायला हवेत. त्याचं वाटप जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केलं जाणार आहे. मागणीप्रमाणे रेमडेसिवीरचा पुरवठा सुरू आहे. अन्न व औषधी प्रशासनाच्या नियंत्रणाखाली आणणार. वितरणातील त्रुटी कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन १ लाखांपर्यंत पुरवठा करण्याची सूचना कंपन्यांना करण्यात आली आहे. नवीन पुरवठा सुरळीत होईपर्यंत रेमडेसिवीरचा वापर काटेकोरपणे करावा,” असं आवाहन टोपे यांनी केलं.