अमरावती : जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत असताना हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने रुग्णसंख्या अधिक असणाऱ्या गावांना सील केले असून जिल्ह्य़ातील अशी तब्बल १०६ गावे सर्वाधिक करोना प्रभावित गावांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे आता या गावांमध्ये बाहेरील नागरिकांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

अमरावती जिल्ह्य़ात दररोज सरासरी ९०० करोनाबाधित आढळून येत आहेत. प्रशासनाच्या विविध उपाययोजना नंतरही रुग्णांच्या संख्येत घट होत नसल्याचे चित्र असल्याने आता ज्या गावांमध्ये अधिक करोना रुग्ण आहेत. अशा गावांमध्ये मात्र बाहेरच्या नागरिकांना प्रवेशबंदी करण्याबाबतचे आदेश महसूल विभागाने काढले आहेत. त्यानुसार १०च्या वर रुग्ण असलेल्या गावांमध्ये बाहेरील नागरिकांना सीमेवरच थांबवण्याचे आदेश महसूल विभागाने दिले आहे. या गावांमध्ये आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आलेली आहे. तर कोणालाही गावांमध्ये जाण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. जिल्ह्य़ातील १४ तालुक्यांमध्ये अशा १०६ गावांची यादी महसूल विभागाने तयार केली असून या १०६ गावांमध्ये करोना रुग्ण सर्वाधिक असल्याने ही गावे आता सील करण्यात आलेली आहे.

गावाच्या बाहेर आढळल्यास २५ हजार दंड

* गृहविलगीकरणातला रुग्ण घराच्या बाहेर आढळल्यास त्याला २५ हजाराचा दंड होणार आहे. या गावांतील ये-जा करण्यासाठी असलेले सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. अतिमहत्त्वाच्या कामासाठी ये-जा करणाऱ्या लोकांची नोंद घेतली जात आहे. सर्व प्रकारची दुकाने बंद राहणार असून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या व्यक्तींच्या नावाची नोंद तहसील कार्यालयात करावी लागणार आहे. नियमाचे पालन न करणाऱ्या नागरिक अथवा व्यावसायिकावर दंडाची कठोर कारवाई केली जाणार आहे. गावातील रुग्णांची वाढती संख्या बघता गावातील कोणीही बाहेर जाऊ नये व बाहेरील व्यक्ती गावात प्रवेश करू नये, याची नोंद घेण्यात येत आहे. अति महत्त्वाच्या कामाकरिता परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच गावांतील सर्व दुकाने पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याची खबरदारी घेण्यात येत आहे.

* अचलपूर तालुक्यातील सीमा बंद केलेल्या गावांपैकी ४ गावे ही परतवाडा व अचलपूर शहरालगतची आहेत. पंचवीस ते तीस हजार लोकसंख्या असलेल्या या गावाच्या हद्दीत शासकीय कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, तसेच अनेक निमशासकीय कर्मचारी वास्तव्यास आहेत. हे लोक नियमितपणे शहरात येणे जाणे करीत असतात. त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

सहकारी बँकेला दहा हजाराचा दंड

भातकु ली येथील सहकारी बँकेसमोर नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी आढळून आल्याने तहसीलदार नीता लबडे यांनी घटनास्थळी भेट देऊन बँकेला दहा हजाराचा दंड ठोठावला आहे. या बँकेसमोर नागरिकांनी कोणत्याच प्रकारचे शारीरिक दुरीचे पालन केले नव्हते, तथा बँकेने करोना प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली दिसली नाही. त्यामुळे हा दंड ठोठावण्यात आल्याचे तहसीलदार नीता लबडे यांनी सांगितले.