राज्यात सोमवारी दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे दिलासादायक चित्र पाहायाला मिळाले. दिवसभरात राज्यात ३७ हजार २३६ नविन करोनाबाधित आढळून आले आहेत. राज्यात मागील ४१ दिवसांमधील सर्वात कमी रुग्णसंख्या ही सोमवारी आढळून आली आहे. महाराष्ट्रात एप्रिल महिन्यात करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे महाराष्ट्रातील १९ हजार नागरिकांवरील मृत्यूचं संकट टळलं आहे.

महाराष्ट्रात करोनाच्या दुसऱ्या लाटेत करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे १९ हजार जणांचे प्राण वाचवता आले आहेत. तर ३८ लाख नव्या करोना रुग्णांची भर पडण्यापासून रोखता आले असल्याची माहिती देशाच्या प्रमुख वैज्ञानिक संस्थापैकी एक असलेल्या भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरूने दिली आहे. राज्यात सरकारने दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रेस्टॉरंट्स, मंदिरे आणि मॉल्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्यात सर्व स्तरावर लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेण्यात आला.

मार्च ३१ नंतर राज्यात पहिल्यांदाच करोना बाधित रुग्णांची संख्या ४० हजारांवरुन ३७ हजारांवर आली आहे. महाराष्ट्राच्या एकूण करोना बाधितांची संख्या आता ५१ लाख ३८ हजार ९७३ वर पोहोचली असून सोमवारी झालेल्या ५४९ मृत्यूंमुळे मृतांची संख्या ही ७६,३९८ वर पोहोचली असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने सांगितले.

९ एप्रिलपासून राज्यात ५० हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत होते. मुंबईत ४ एप्रिलला पहिल्या लाटेच्या तीन पट अधिक म्हणजे ११ हजार २०६ रुग्ण आढळून आले होते. सोमवारी हाच आकडा १,७८२ इतका होता. यापूर्वी महाराष्ट्रात ३१ मार्च रोजी ३९ हजार ५४४ करोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. महाराष्ट्रात आता ५ लाख, ९० हजार ८१८ सक्रिय रुग्ण आहेत.

आयआयएससीच्या अहवालानुसार महाराष्ट्रात १५ दिवसांच्या लॉकडाउमुळे १९ हजार जणांचे प्राण वाचवता आले तर ३८ लाख नव्या रुग्णांची भर पडण्यापासूनही रोखता आली आहे.

राष्ट्रीय आकडेवारीनुसार राज्यात ९ मे पूर्वी ९५ हजार ३०० मृत्यू होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. प्रत्यक्ष्यात मृतांची संख्या ७५ हजार ८५० पर्यंत आली. तसेच ९ मे पर्यंत ८९ लाखांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज असलेली रुग्णसंख्या ही ५१ लाखांवर आटोक्यात आली आहे.

राष्ट्रीय अंदाजांपेक्षा महाराष्ट्राने चांगली कामगिरी केली असली तरी तमिळनाडू आणि केरळसारख्या इतर राज्यांना ही कामगिरी करता आलेली नाही, असे आयआयएससीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आयआयएससीने या राज्यांमध्ये लोकांचे प्राण वाचवण्यासाठी मे अखेरीस लॉकडाउनसारखे कडक निर्बंध लावण्याची सूचना केली आहे.