वाढते रुग्ण आणि मृत्यूंमुळे निर्बंध

पुणे: गेल्या काही दिवसांपासून करोनाचे वाढते रुग्ण आणि मृत्यूंमुळे अतिसंवेदनशील बनलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीनही जिल्ह्य़ांत आठ दिवसांची कठोर टाळेबंदी जाहीर केली आहे.

सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये गेल्या आठवडय़ापासून रोज दीड हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. साताऱ्यात तर ही रोजची रुग्णसंख्या अडीच हजारांच्या घरात पोहोचल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. रुग्णांना खाटा न मिळणे, प्राणवायू- रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवू लागल्याने अनेक रुग्ण अत्यवस्थ होत आहेत. या रुग्णांना वैद्यकीय सुविधा मिळवून देणे नातेवाईकांपासून ते रुग्णालय प्रशासनाला अवघड बनले आहे. यामुळे योग्य ते उपचार न मिळाल्यामुळे किंवा उपचारास विलंब झाल्याने या तीनही जिल्ह्य़ांतील मृत्यूचा दर गेल्या काही दिवसांत मोठय़ा प्रमाणात वाढला होता. या जिल्ह्य़ात रोज प्रत्येकी तीस ते चाळीस जणांचा करोनामुळे मृत्यू होत आहे.

करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गंभीर बनलेल्या या परिस्थितीमुळे अखेर या तीनही जिल्ह्य़ांत कडक टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. यानुसार सातारा, सांगली येथे ८ दिवसांसाठी तर कोल्हापुरात १० दिवसांसाठी ही टाळेबंदी लागू करण्यात आली आहे.

साताऱ्यात या निर्बंधाची अंमलबजावणी सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झाली आहे तर सांगली आणि कोल्हापूर मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरू होत आहे. या टाळेबंदीच्या कालावधीमध्ये दूध, भाजीपाला, किराणा आदी जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अत्यावश्यक सेवा घरपोच देण्यात येतील. असे प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य नागरिकांना केवळ वैद्यकीय कारणांसाठीच घराबाहेर पडण्यास मुभा देण्यात आली आहे.

गोकुळ आणि टाळेबंदी

कोल्हापूर जिल्ह्यात करोना रुग्ण झपाटय़ाने वाढत आहेत. अशाही स्थितीत न्यायालयाच्या आदेशाने गोकुळ दूध संघाची निवडणूक घेतल्याने जिल्ह्य़ाचे राजकारण ढवळून निघाले. आज निकाल लागला आणि कडक टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय घेतल्याने त्याची चर्चा होत राहिली.