प्रशांत देशमुख

करोनाचा कहर आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची अडचण व गावकऱ्यांच्या शंका यात तडजोड करण्यात सरपंचांना यश आल्याने भटकंती करीत आलेले ते सहाही मजूर गावच्या अंगणवाडीत विसावले.

वर्धेलगत वडद व आजगाव येथील सहा मजूर ठाण्याजवळच्या तुर्भे येथे कामाला होते. करोनाचे सावट पसरताच त्यांनी गावी परतण्याचा निर्णय घेतला. संचारबंदी असल्याने व सर्व वाहतूक ठप्प झाल्याने त्यांनी पायीच गावी परतण्याचा निर्णय घेतला. सहा दिवसात दहा जिल्हे ओलांडून हजारभर किलोमीटरचा प्रवास त्यांनी रविवारी रात्री पूर्ण केला. तपासणीनंतर त्यांना ठेवायचे कुठे हा प्रश्न उद्भवला होता. तपासणी झाल्यावर या सहाही मजूरांना वर्धेतील निवारागृहात ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सूचित केले होते.

मात्र, सोमवारी सायंकाळी वेगळाच तिढा उद्भवला. कार्यरत निवारागृहात नव्यांचे विलगीकरण आरोग्यदृष्ट्या योग्य नव्हते. तर दुसरीकडे गावकरी या गावच्याच मजूरांना गावात घ्यायला तयार नव्हते. प्रशासन व गावकरी अशी कोंडी झाल्यावर सरपंच सुशील वडतकर यांनी मध्यममार्ग सुचविला. गावातील अंगणवाडी रिकामीच असल्याने त्यात या मजूरांना ठेवता येईल. गावकऱ्यांची भितीही दूर होईल व मजूरांचे गावातच विलगीकरण शक्य होईल, असा सरपंचाचा तोडगा सर्वमान्य झाला.

त्यानंतर रात्रीच त्या सर्वांची अंगणवाडीत व्यवस्था झाली. सरपंचाने घरचे जेवण त्यांना खावू घातले. मात्र, एकाच व्यक्तीवर भार नको म्हणून उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी विलगीकरणाच्या काळात मजूरांवर होणारा सर्व खर्च देण्याचे स्पष्ट केले त्यामुळे याबाबतचा वाद निवळला. दहा जिल्ह्याची संचारबंदी झुगारून परतलेल्या या मजूरांच्या धाडसाबद्दल आश्चर्य व्यक्त होत असतानाच स्थानिक पातळीवर आरोग्य खात्याने दाखवलेला हलगर्जीपण सुध्दा इथे चर्चेचा विषय झाला आहे.