रायगड जिल्ह्यात आजपासून पुन्हा एकदा कडकडीत टाळेबंदीला सुरूवात झाली आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मंगळवारी रात्री याबाबतचे आदेश जारी केले. रायगड पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात २६ जुलैपर्यंत ही टाळेबंदी सुरु राहणार आहे.

जिल्ह्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व आमदार आणि प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली होती. यानंतर पालकमंत्र्यांनी टाळेबंदी लागू करण्याची घोषणा केली होती. यानंतर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी टाळेबंदीचे आदेश जारी केले. १५ जुलैला मध्यरात्री १२ वाजल्यापासून २६ जूलैला मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हे टाळेबंदी आदेश जारी राहणार आहेत.

अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद राहणार आहेत. बाजारपेठा, भाजीविक्री, मासेविक्री, चिकन आणि मटन विक्री पुर्णपणे बंद राहणार आहे. सलून आणि ब्यूटीपार्लर सेवा, उपहारगृह, खाद्य पदार्थ स्टॉल्स बंद राहणार आहेत. शाळा महाविद्यालये बंद राहणार आहेत. मात्र ऑनलाईन शिक्षण सुरु राहणार आहे. सकाळ संध्याकाळ व्यायामासाठी फेरफटका मारण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सायकलिंग करण्यासही मज्जाव असणार आहे.  रिक्षा, दुचाकी आणि हलक्यावाहनांच्या वाहतुकीवर नियम लागू राहणार आहेत. अत्यावश्यक सेवेसाठीच वाहनांचा वापर करता येणार आहे.

कारखाने २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु राहणार आहेत. बांधकामे बंद राहणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांवर, तसेच थुंकणाऱ्यांकडून ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे.  तर बँका, औषधांची दुकाने, कुरिअर सेवा, दूध विक्री, गॅस वितरण, वृत्तपत्र विक्री आणि शेतीची कामे, सरकारी कार्यालये सुरु राहणार आहेत, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत.