प्रशांत देशमुख

वर्धा येथील प्रख्यात फौजदारी वकील परमानंद टावरी यांच्या घरी गेल्यास एक चुणचुणीत चिमुरडी लॅपटॉपवर गंमत जंमत करीत असल्याचे पाहायला मिळते. तिला आई कुठ आहे?, असं विचारल्यास आईतर ठाण्याला आहे, असं उत्तर तिच्याकडून मिळतं. यातूनच ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयात समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या डॉ. खुशबू टावरी‑मोदी यांच्या कार्याचा उलगडा होतो.

शहर क्षयरोग अधिकारी म्हणून कार्यरत डॉ. खुशबू या अ‍ॅड. टावरी यांच्या कन्या होत. डॉ. खुशबू यांची कन्या गुंज ही वर्धेला आली असतांनाच टाळेबंदी झाल्याने परत आईकडे ठाण्याला जावू शकली नाही. मुलगी माहेरी आजोबांकडे असूनही करोनाबाधित ठाणे क्षेत्रात सर्वस्व झोकून देत डॉ. टावरी कार्यरत आहे. सलग ५३ दिवस काम केल्यानंतर त्यांना गेल्या रविवारी फक्त एक सुट्टी मिळाली. तिथेही त्यांचे १३ व्यक्तींचे कुटुंब आहे. लोकांची, कुटुंबाची व माहेरी असलेल्या मुलीची अशी तिहेरी जबाबदारी सांभाळणाऱ्या डॉ. टावरी यांचे मुलीशी बोलणे होतच नाही. काम आटोपून त्या घरी परतल्यावर मुलीला फोन करतात तेव्हा मुलगी गुंज झोपलेली असते. तर दिवसा त्या स्वत: कामात असल्याने मुलीचा संपर्क संवाद शक्य नसतो.

ठाणे महापालिकेचे कर्मचारी अधिकारी यांची राहण्याची व्यवस्था नसल्याचे कळल्यावर त्यांना वेगवेगळ्या हॉटेलमध्ये थांबविण्यात आले. आता रोज त्यांच्याशी संपर्क ठेवून अहवाल तयार करण्याची दैनंदिन जबाबदारी आहे. ठाण्यातील विविध संस्था व सोसायटीतील लोकांचे मदतीचे हात पुढे आल्याचे त्या सांगतात. वर्धेतून मुलीला आणण्याची डॉ. खुशबू यांनी तयारी केली होती. पण आजोबा व आजी हर्षाताई यांनी नातीला अन्य कोणामार्फत पाठविण्यास नाकारले. ही चिमुरडी घरबसल्याच आईच्या कार्याला सलाम ठोकते आणि उलट आईलाच काळजी घेण्याचा सल्लाही देते.