जिल्ह्यात वाढती करोना रूग्णसंख्या पाहता शनिवारी मध्यरात्रीपासून ८ दिवस कडकडीत टाळेबंदी पाळण्याचा निर्णय  आज एका बैठकीत घेण्यात आला. जिल्ह्यात वाढणारी करोना रूग्णसंख्या, त्याप्रमाणात प्राणवायू आणि रेमडेसिवीरची कमतरता पाहता आज (बुधवार) दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून बैठक घेण्यात आली. या बैठकीत  लोकप्रतिनिधी, प्रमुख अधिकारी सहभागी झाले होते.

यावेळी पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, जिल्ह्यात व्हेंटिलेटरची संख्या १०० वरून ४०० वर पोहचली आहे. प्राणवायूचा पुरवठाही वाढवत आहे. तिसऱ्या लाटेची तयारीही करत आहोत. शेवटच्या क्षणाला रूग्ण उपचारासाठी येत असल्याने मृत्यूदर वाढत आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्ह्यासाठी रेमडेसिवीरचा कोटा दुप्पट करत असल्याचे आणि १० मेट्रिक टन प्राणवायू पुरवठा केला जाईल, असे सांगितले आहे. बाधितांची संख्या कमी करण्यासाठी साखळी तोडण्यासाठी कडक टाळेबंदी शिवाय पर्याय नाही.

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार संभाजीराजे छत्रपती खासदार धैर्यशील माने, तसेच प्रकाश आवाडे, अरुण लाड, राजेश पाटील,ऋतुराज पाटील, चंद्रकांत आसगावकर, चंद्रकांत जाधव आणि आमदार विजय देवणे यांनी देखील यावेळी सूचना केल्या.