पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया या तीन जिल्ह्यात मिठाचा तुटवडा असल्याची मोठी अफवा पसरली होती. त्यामुळे किराणा दुकानात मिठासाठी लोकांनी गर्दी केली. परंतू, मिठाचा तुटवडा नाही, ही अफवा असल्याचे तिन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ही अफवा पासरविणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही दिला आहे.

करोना प्रादुर्भावाच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये मिठाचा तुटवडा असल्याची अफवा पसरली आहे. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा मिठाचा तुटवडा नाही तर मोठ्या प्रमाणात मीठ साठा उपलब्ध आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी स्पष्ट केले. तसेच बाबत कोणी अफवा पसरविल्यास त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. सावली, सिंदेवाही व ब्रम्हपुरी तालुक्यामध्ये काही लोकांकडून ही अफवा पसरवण्यात आली आहे.

नागरिकांनी मीठ खरेदीसाठी रांगा लावू नयेत किंवा जास्तीचे पैसे देऊन मीठ खरेदी करू नये, अफवांवर विश्वास ठेवून लोकांनी मीठाचा साठा करुन नये, त्यामुळे जिल्हयात मीठ संपण्याच्या अडचणीस सामोरे जावे लागेल, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

किराणा दुकानदारांनाही याबाबत आवश्यक काळजी घेऊन ग्राहकांकडून जास्तीचे पैसे घेऊन मीठ विक्री करू नये, असे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच मीठ खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना याबाबत खरी माहिती द्यावी, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. अचानक वाढलेली मागणी व बाजारपेठेतील मीठाची झालेली कृत्रिम टंचाई याबाबत प्रशासनाने दखल घेऊन नागरिकांना आवाहन केले की, प्रशासनाकडून दिलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा, कोणतीही अफवा असल्याचे लक्षात आल्यास ताबडतोब प्रशासनाला कळवा आणि त्याबाबत खात्री करून घ्या.

चंद्रपूर जिल्हयात उपविभागनिहाय विशेष तपासणी पथक स्थापन करण्यात आलेले असून त्यांच्यामार्फत जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांची तपासणी करण्यात येत असून लॉकडाउनच्या काळात आजपर्यंत या पथकांनी ४४६ तपासण्या केल्या असून १३ दुकानांविरुध्द कारवाई करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंबाबत काही तक्रारी असल्यास जिल्हा पुरवठा कार्यालयात तक्रात करावी, असे आवाहन चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. खेमनार आणि गडचिरोली जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.