प्रशांत देशमुख

टाळेबंदीमुळे वर्धा आणि चंद्रपूरमध्ये अडकलेले हजारो परप्रांतीय मजूर आज विशेष रेल्वे गाडीने वर्ध्यातून त्यांच्या बिहार राज्याकडे रवाना झाले. यावेळी पालकमंत्री सुनील केदार, खासदार रामदास तडस, आमदार रणजीत कांबळे यांनी या मजुरांशी रेल्वे स्थानकावर संवाद साधत त्यांच्या सुखरूप प्रवासाच्या शुभेक्षा दिल्या.

टाळेबंदीत वर्धा जिल्ह्यातील विविध तालुक्यात ७०० तसेच चंद्रपूरचे ३४९ मजूर कुटूंबासह अडकले होते. चंद्रपूरच्या मजूरांना खास बसने आज सकाळी वर्धेत आणण्यात आले. दुपारी गाडी सुटण्यावेळी प्रखर उन असल्याने रेल्वे प्रशासनाने सावलीसाठी मंडप टाकला होता. तसेच स्वागत कमान व रांगोळी रेखाटून उत्सवी वातावरण करण्यात आले होते. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दिलेल्या निरोपाला या पाहुण्यांनीही टाळ्यांनीच प्रतिसाद दिला. प्रत्येक कुटूंबासोबत पिण्याचे पाणी व फुडपॅकेट देण्यात आले होते. या सर्व व्यवस्थेत प्रशासनाला विविध व्यक्ती व संस्थांनी मदत दिली.

प्रवीण हिवरे यांनी पाण्याची तर वैद्यकीय जागृती मंचने जेवणाची सोय केली. तालुक्यातून मजुरांना आणण्यासाठी सचिन अग्निहोत्री यांनी बसेस दिल्या. तसेच प्रवासासाठी पूरक साहित्य मुरली केला व कृपलानी यांनी दिले. जिव्हाळा, प्रहार व माजी सैनिक संघटनेने गर्दीचे नियंत्रण, आसन व्यवस्था व अन्य स्वरूपात मदत दिली. तिकिटाच्या पैशांची मदत जिल्हा काँग्रेस समितीने केली होती. जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, पोलीस अधिक्षक डॉ. तेली, काँग्रेसनेते शेखर शेंडे या निरोपावेळी आवर्जून उपस्थित होते.