राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी दुष्काळाच्या विविध प्रश्नांवर शुक्रवारी प्रांताधिका-यांच्या कक्षात तहसीलदार सुभाष भाटे यांना सुमारे दीड तास कोंडून ठेवले. त्याच वेळी कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलनही केले.
ढाकणे यांनी दोन दिवसांपूर्वीच प्रांताधिकारी ज्योती कावरे यांना निवेदन देऊन मोर्चाची कल्पना दिली होती. मात्र पूर्वसूचना देऊनही त्या शुक्रवारी मोर्चा आला त्या वेळी कार्यालयात नव्हत्या, त्यामुळे ढाकणे यांच्यासह आंदोलक संतप्त झाले. कावरे टंचाईबाबतच्या बैठकीसाठीच शेवगावला गेल्या होत्या. मोर्चा आल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तहसीलदारांशी चर्चा करण्यास सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी लगेचच तहसीलदार भाटे यांना प्रांताधिका-यांच्या कक्षातच कोंडून बाहेरून कडी लावून घेतली व नगर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. सुमारे दीड तास हे आंदोलन सुरू होते. अखेर कावरे शेवगावहून परतल्या, त्यांनी आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब टाके, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अनिल कराळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिठूभाई शेख आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.