News Flash

‘लोकबिरादरी’तून भावी डॉक्टर घडणार; डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना देणार मोफत मार्गदर्शन

समिक्षा गोडसे आमटेंच्या संकल्पनेतून लोकबिरादरी व लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट संस्थेचा ‘उलगुलान’ उपक्रम

प्रातिनिधिक फोटो (अनिकेत आमटे यांच्या फेसबुक पेजवरुन साभार)

नक्षलवादग्रस्त गडचिरोली व मेळघाटातील वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी ‘उलगुलान’

लोकबिरादरी प्रकल्प आणि लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट या संस्थेने संयुक्तणे ‘उलगुलान’ हा वैद्यकीय प्रवेश परीक्षेची पूर्व तयारी करवून घेणाऱ्या प्रशिक्षण वर्गाची सुरूवात करण्याची घोषणा केलीय. डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या व कठोर परिश्रमाची तयारी असलेल्या नक्षलवादग्रस्त गडचिरोली आणि मेळघाटातील आर्थिक दृष्ट्या मागास आणि अतिमागास विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
यात ३० विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. तसेच त्याची सर्वस्वी जबाबदारी संस्था स्विकारणार आहे. समीक्षा गोडसे आमटे यांच्या संकल्पनेतून ‘उलगुलान’ सुरू करण्यात आले आहे.

नेलगुंडासारख्या अति असुरक्षित भागात सुरू झालेले साधना विद्यालय असो किंवा कोविड १९ च्या कठीण काळात गावागावात जावून शिकवणे असो लोकबिरादरी प्रकल्प शिक्षण क्षेत्रात आपलं योगदान देण्यात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. दहावीनंतर काय हा प्रश्न सर्व मुलांना सतावत असतो आणि गडचिरोलीतील अतिदुर्गम भागातील मुलांना तर उच्च शिक्षण घेणे परिस्थितीमुळे शक्य होत नाही. अशी मुले कितीही गुणवान असली तरी उच्च शिक्षणाला मुकतात. अशा गरीब, अतिमागास परंतु होतकरू विद्याथ्र्यांसाठी लोकबिरादरी प्रकल्प आणि लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट या संस्था एकमेकांच्या सहयोगाने निट परिक्षा म्हणजेच वैद्यकीय प्रवेश परीक्षेची पूर्व तयारी करवून घेणारा प्रशिक्षण वर्ग सुरु करत आहेत.

इंग्रजांविरूध्द क्रांतीचे रणशिंग फुंकणाऱ्या बिरसा मुंडा या आदिम समाजातील थोर क्रांतिकारकाच्या प्रेरणेने आणि समीक्षा गोडसे आमटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या उलगुलान बिरूद मानाने मिरवणाऱ्या या प्रशिक्षण वर्गातून जास्तीत जास्त डॉक्टर्स या दुर्गम भागातून तयार होतील. या प्रशिक्षण वर्गाची पूर्ण माहिती देणार परिपत्रक १० मार्च रोजी सावित्रीबाई फुलेंच्या १२४ व्या पुण्यतिथी निमित्ताने ज्येष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश बाबा आमटे यांच्या हस्ते मोबाईलचे बटण दाबून डिजिटली सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. याप्रसंगी डॉ.मंदाकिनी आमटे, अनिकेत आमटे, समीक्षा गोडसे, प्राचार्य डॉ.विलास तळवेकर उपस्थित होते. जून २०२१ पासून सुरू होणाऱ्या या प्रशिक्षण वर्गाच्या यशस्वीतेसाठी प्रवीण अहिरे, लीना चंद्रिकापुरे आणि कांचन गाडगीळ या शिक्षकांचा मोलाचा हातभार लागणार आहे.

हे प्रशिक्षण वर्ग मुख्यत: गडचिरोली आणि मेळघाटातील आर्थिक दृष्ट्या मागास आणि अतिमागास विद्यार्थी जे यावर्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण होणार आहेत व ज्यांना डॉक्टर व्हायचे आहे अशा विद्याथ्र्यांसाठी आहेत. या प्रशिक्षण वर्गात वैद्यकीय प्रवेश परीक्षेची पूर्ण तयारी लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा येथे करवून घेण्यात येईल. फक्त ३० मुलामुलींची निवड प्रवेश परीक्षा व मुलाखत याव्दारे गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. निवड झालेल्या मुलामुलींची प्रशिक्षणाची सोय, भोजन व निवासाची व्यवस्था प्रकल्पात विनामुल्य करण्यात येईल. तसेच विद्याथ्र्यांकडून ११ वी व १२ वीची विज्ञान विभागाच्या परिक्षेची तयारी करवून घेतली जाईल. हे प्रशिक्षण लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट या संस्थेच्या तरूण होतकरू कार्यकर्ते, डॉक्टर्स, अभियंता यांच्याकडून चालविण्यात येणार आहे. ज्या विद्याथ्र्यांना डॉक्टर व्हायचे आहे, त्यासाठी अपार मेहनत करण्याची तयारी आहे त्यांनी जरूर आताच पेन उचलावे व नाव नोंदणी करावे असे आवाहन लोकबिरादरी तर्फे करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2021 4:00 pm

Web Title: lok biradari prakalp hemalkasa to give free guidance for poor students who want to be a doctor scsg 91
Next Stories
1 वसईमध्ये लसीकरण केंद्रात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; आरोग्य सुविधा नसल्याने संताप
2 सरकारने तुझं माझं करण्यापेक्षा मराठा आरक्षण प्रश्न सोडवावा – संभाजीराजे
3 “सरकारची जत्रा अन् कारवाई सतरा!” गोपीचंद पडळकरांचा पुन्हा सरकारला इशारा!
Just Now!
X