आठ राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक एकाच वेळी घेण्याची निवडणूक आयोगाची तयारी

मुंबई : लोकसभेबरोबर आठ राज्यांमधील विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची तयारी निवडणूक आयोगाने दर्शविल्याने महाराष्ट्रात एकत्रित निवडणूक शक्य आहे. अर्थात एकत्रित की नियोजित वेळी राज्य विधानसभेची निवडणूक घ्यायची याचा निर्णय भाजप नेतृत्वावर अवलंबून असेल.

लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुका घेण्याची मागणी करणारे पत्र भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी गेल्याच आठवडय़ात विधि आयोगाला पाठविले. लोकसभेबरोबरच ११ राज्यांच्या विधानसभा निवडणुका होतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. पण लोकसभेबरोबरच ११ राज्यांमध्ये एकत्रित निवडणूक घेणे शक्य होणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. लोकसभेबरोबरच विधानसभांची मुदत संपणाऱ्या ओडिसा, आंध्र प्रदेश, तेलंगण, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या पाच राज्यांची निवडणूक होईल. याबरोबर आणखी तीन राज्यांची विधानसभा निवडणूक घेता येईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. लोकसभेबरोबरच आठ राज्यांच्या विधानसभा निवडणुका घेण्यासाठी मतपावती यंत्रे (व्हीव्हीपॅट) उपलब्ध असतील, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

लोकसभेनंतर सहा महिन्यांच्या मुदतीतच भाजपची सत्ता असलेल्या महाराष्ट्र, हरयाणा आणि झारखंड या राज्यांच्या विधानसभेची मुदत संपत आहे. निवडणूक आयोगाने लोकसभेबरोबर आठ राज्यांची विधानसभेची निवडणूक घेता येईल, असे स्पष्ट केल्याने या तीन राज्यांमध्ये एकत्रित निवडणुका घेता येतील. भाजपचे नेतृत्व कोणता निर्णय घेते यावरच सारे अवलंबून असेल.

लोकसभेबरोबरच राज्य विधानसभेची निवडणूक घेण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फारसे अनुकूल नाहीत. पक्षाने आदेश दिल्यास त्यांचाही नाइलाज होऊ शकतो. १९९९ मध्ये नियोजित वेळेपूर्वी राज्य विधानसभेची निवडणूक घेण्यात आली असता युतीला सत्ता गमवावी लागली होती. यामुळेच मुख्यमंत्री फडणवीस हे नियोजित वेळेतच निवडणुका झाल्या पाहिजेत यासाठी आग्रही आहेत.