नरेंद्र मोदी वाराणसीतून लढणार * गांधीनगरमधून अडवाणींऐवजी अमित शहा * मुंबईतील दोनच उमेदवार जाहीर * नगरमधून सुजय विखेंना उमेदवारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राजनाथ सिंह यांना स्थान देण्यात आले आहे. गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघातून ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याऐवजी पक्षाध्यक्ष अमित शहा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

राज्यातील १६ उमेदवारांच्या यादीत लातूर आणि नगरच्या विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. तसेच पुणे, माढा या मतदारसंघांतील उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. ईशान्य मुंबईचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या नावाला झालेला विरोध लक्षात घेता या मतदारसंघाचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे.

भाजपने १८४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. गांधीनगर मतदारसंघाचे १९९८ पासून प्रतिनिधित्व करणाऱ्या लालकृष्ण अडवाणी यांना यंदा संधी देण्यात आलेली नाही. त्याऐवजी पक्षाध्यक्ष अमित शहा हे गांधीनगर मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. अडवाणी यांना अन्य दुसऱ्या कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार की त्यांना निवडणुकीच्या राजकारणातून सक्तीची निवृत्ती देण्यात आली, हे स्पष्ट झालेले नाही. याबरोबरच माजी पक्षाध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांच्या उमेदवारीचा निर्णय झालेला नाही.

पंतप्रधान मोदी हे उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी वाराणसी आणि गुजरातमधील बडोदा या दोन मतदारसंघांतून निवडणूक लढविली होती. यंदा मात्र फक्त वाराणसीतूनच त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

भाजपच्या पहिल्या यादीत राज्यातील २५ पैकी १६ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. नगरचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांच्याऐवजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लातूरचे विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांनाही दुसऱ्यांदा संधी नाकारण्यात आली असून माजी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पुणे मतदारसंघाचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांना उमेदवारी देण्यास विरोध झाला आहे. पुण्याचा निर्णय अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. ईशान्य मुंबई मतदारसंघाचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला पक्षातूनच तसेच शिवसेनेने विरोध दर्शविला होता. यामुळेच पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत सोमय्या यांच्यासह दुसरे नाव सुचविण्यास सांगण्यात आले होते. मुंबईतील पूनम महाजन आणि गोपाळ शेट्टी या दोन विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली असली तरी सोमय्या यांच्या उमेदवारीचा निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. त्यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

१४ विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी

राज्यात भाजपचे सध्या २२ खासदार आहे. यापैकी १४ विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. दोघांना उमेदवारी नाकारण्यात आली. नागपूरमधून नितीन गडकरी, जालनामधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. माढा मतदारसंघातील उमेदवारीचा निर्णय घेण्यात आलेला नाही. राष्ट्रवादीचे नेते रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला; पण तेव्हा त्यांच्या उमेदवारीबाबत पक्षाने काही संकेत दिले नव्हते. याउलट सुजय विखे यांच्या प्रवेशाच्या वेळी त्यांचे नाव संसदीय मंडळाकडे सुचविले जाईल, असे जाहीर करण्यात आले होते.

राज्यातील उमेदवार

* नागपूर – नितीन गडकरी

* नंदुरबार – डॉ. हिना गावित

* धुळे – डॉ. सुभाष भामरे

* रावेर – रक्षा खडसे

* अकोला – संजय धोत्रे

* वर्धा – रामदास तडस

* चंद्रपूर – हंसराज अहिर

* गडचिरोली-चिमूर – अशोक नेते

* जालना – रावसाहेब दानवे

* भिवंडी – कपिल पाटील

* उत्तर मुंबई – गोपाळ शेट्टी

* उत्तर मध्य मुंबई – पूनम महाजन

* नगर – सुजय विखे-पाटील

* बीड – डॉ. प्रीतम मुंडे

* लातूर – सुधाकर शृंगारे

* सांगली – संजयकाका पाटील