पालघर : शिवसेना-भाजप युतीचा पराभव करण्यासाठी माकपने पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीला (बविआ) पाठिंबा दिला आहे. आपल्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी ‘बविआ’ने काँग्रेस-राष्ट्रवादीसह सप- बसप व इतर सर्व समविचारी पक्षांना साद घातली आहे.

पालघरमध्ये माकपचा पािठंबा मिळवण्यासाठी अनेक दिवसांपासून हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी प्रयत्नशील होती. याबाबत माकपच्या जिल्हा कार्यकारिणीने १९ मार्चला झालेल्या बैठकीत सहमती दर्शवल्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांच्याशी चर्चा करून पाठिंब्याचा निर्णय घेण्यात आला. पालघरमध्ये माकप आणि बविआ यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मनोमिलनाचा निर्णय जाहीर केला. आगामी सर्व निवडणुका माकप आणि बविआ हे एकत्र लढतील, असे माकपचे ज्येष्ठ नेते डॉ. अशोक ढवळे यांनी जाहीर केले. बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला माकपने पाठिंबा दिल्याची घोषणा झाल्याने या पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक लढवली जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, ही निवडणूक शिट्टी या चिन्हावरच लढवण्यात येईल, असे सांगण्यात आले. विधानसभा निवडणुकीत डहाणू, विक्रमगड व इतर मतदारसंघांत माकप लढणार आहे.