News Flash

शिर्डीत मतदानासाठी रांगा

शिर्डी लोकसभा मतदारसंघात उन्हाची तीव्रता खूप जास्त असूनही मतदारांनी उत्साहात मतदान केले

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी कुटुंबीयासह मतदान केले.

राहाता : शिर्डी लोकसभा मतदारसंघात उन्हाची तीव्रता खूप जास्त असूनही मतदारांनी उत्साहात मतदान केले, मतदानासाठी सकाळपासून रांगा लागल्या होत्या.

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार शिर्डी लोकसभा मतदार संघातील ९ मतदान केंद्र हे सखी मतदान केंद्र म्हणून निवडण्यात आले होते. या सर्व मतदान केंद्रावर महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तालुक्यातील पिंपळवाडी येथील सखी मतदान केंद्रावर महिला मतदारांचे गुलाबपुष्प देऊ न स्वागत करण्यात येत होते.

तालुक्यात  आज तापमानाचा पारा हा ४२ वर असतांना देखील मतदारांनी आपला हक्क बजावत मतदान केले.दक्षिणेप्रमाणे येथेदेखील युतीचा उमेदवार निवडून येईल, असा दावा डॉ.सुजय विखे पाटील यांनी केला असून जनतेला जो संदेश दिला तो त्यांनी पाळला, असे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.     सकाळी श्रीमती सिंधुताई विखे, माजीमंत्री राधाकृष्ण विखे,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे ,नगर दक्षिणचे भाजपाचे उमेदवार डॉ.सुजय विखे , माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के ,प्रवरा अभिमत विद्यापीठाचे प्रकुलपती राजेंद्र विखे, धनश्री विखे यांनी लोणीबुद्रुक येथे, तर नंदिनी अशोकराव विखे यांनी लोणी खुर्द येथे मतदानाचा हक्क बजावला. खासदार सदाशिव लोखंडे व माजी खासदार व अपक्ष उमेदवार भाऊ साहेब वाकचौरे यांनी शिर्डी येथे मतदानाचा हक्क बजावला.

शिर्डीची जनता नेहमीच आपल्या सोबत राहीली आहे.त्यांचा निर्णय त्यांनी घेतला आहे.त्यामुळे निकाल देखील त्याच पध्दतीने लागेल, असे माजी मंत्री राधाकृष्ण विखे  यांनी प्रतिक्रिया देतांना सांगत, मी माझा निर्णय लवकरच जाहीर करणार आहे, असे आजही पुन्हा स्पष्ट केले.

खा.सदाशिव लोखंडे यांच्यामुळे निळवंडे कालव्याच्या कामांना गती मिळाली. उत्तर आणि दक्षिणेचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठीच आम्ही एकञित प्रयत्न करणार आहोत,असे डॉ.सुजय विखे यांनी सांगितले.

शिर्डी विधानसभा मतदार संघातील २७ मतदान केंद्रांवर २७ ई व्हीएम एम मशीन तांत्रिक अडचणीमुळे बंद पडल्याने अर्ध्या तासाच्या आत मशिन बदलण्यात आल्याने मतदान प्रRिया सुरळीत पार पडली. मशिन दुरूस्त करण्यासाठी ९ अभियंते व ६ जणांचे शीघ्र पथक नेमण्यात आले होते. किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले, अशी माहिती शिर्डीचे सहायक निवडणूक अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली.

तालुक्यातील राजुरी  गावातील शेख यांच्या मुलाचे आज  लग्न होते. नवरदेव मतदान करप्यासाठी मतदान कें द्रावर गेला, परंतु  मतदान मशीन बंद असलेमुळे तो परत गेला.दुपारी  ४वाजून४० मिनिटांनी  पिपळवाडी येथे लग्न लावून आलेला नवरदेव शारुख शेख  व त्याचे नातेवाईक यानी राजुरी येथील मतदान केंद्रावर येऊन मतदान केले.

अकोल्यात ६३ टक्के मतदान

अकोले : अकोले विधानसभा मतदार संघात सुमारे ६३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. काही ठिकाणी इव्हीएम मध्ये झालेला बिघाड तसेच पेमरेवाडी येथे मतदारांनी मतदानावर टाकलेला बहिष्कार वगळता, मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

लोकसभेच्या या निवडणुकीत अकोले तालुक्यात निवडणुक प्रचार असा झालाच नाही. ना मोठयांच्या सभा झाल्या, ना आरोप — प्रत्यारोप झाले. प्रचाराच्या आघाडीवर निवडणूक तापली नसली तरी त्याचा कोणताही परिणाम मतदानावर झाला नाही. अकोलेकरांनी उत्साहाने मतदान करीत आपल्या राजकीय प्रगल्भतेचे दर्शन घडविले. एकूण २ लाख ५३ हजार ५७६  मतदारांपैकी १ लाख ५८ हजार ८०३ म्हणजे ६२.६३ टक्के मतदारांनी मतदान केले. अंतिमआकडेवारीत यात थोडया प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. पुरूषांच्या मतदारांची टक्केवारी ६५.३९ टक्के राहिली तर महिलांमध्ये ५९.५९ टक्के महिलांनी मतदान केले.

अकोले मतदार संघातील ३०८ मतदान केंद्रावर आज सकाळी मतदानास सुरुवात झाली. अनेक ठिकाणी सकाळीच मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती. दुपारनंतर मतदारांचा वेग काहीचा मंदावला असला तरी दिवसभर मतदार मतदानासाठी येत होते.अनेक ठिकाणी मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदारांच्या रांगा लागलेल्या दिसून येत होत्या.

अकोले येथील मतदान केंद्र Rमांक १२८ सखी मतदान केंद्र होते. तेथे सव्वा सात वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु होती. धामणगाव आवारी सारख्या अन्य काही ठिकाणीही सात वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु होती. सकाळी मतदान सुरु झाल्यानंतर अबितखिंड, अकोले मतदान केंद्र १३२, रुंभोडी, औरंगपूर, धुमाळवाडी, खिरविरे, पांजरे, कुमशेत, मोरवाडी या ठिकाणी इव्हीएम संदर्भात तक्रारी आल्या होत्या.

काही ठिकाणी इव्हीएम बदलून देण्यात आले. आदिवासी भागाच्या तुलनेत राजकीय दृष्टया जागृत असणाऱ्या प्रवरा खोऱ्यात मतदारांमध्ये अधिक उत्साह दिसून आला.

कोपरगावमध्ये ६१.८० टक्के मतदान

कोपरगाव : तालुक्यात शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी २१९ कोपरगाव मतदार संघांतर्गत संध्याकाळी सहा पर्यंत ६१.८० टक्के मतदान झाले असल्याची माहिती, निवडणूक अधिकारी राहुल मुंडके,सहायक अधिकारी योगेश चंद्रे यांनी दिली.  शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी कोपरगाव येथे मतदान सुरु झाले, मात्र अनेक केंद्रांवरील ईव्हीएम मशीन सुरु न झाल्याने सकाळी मतदानासाठी आलेल्या मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले. त्यातच संबंधित अधिकारी ,पोलीस मतदारांशी उद्धटपणे बोलत होते. त्यामुळे मतदारांचा पारा सकाळीच चढला गेला.

उन्हाचा पारा ४३ अंशाच्या पुढे गेल्याने मतदारांनी सकाळी मतदान करण्याकडे पसंती दिली. काही ठिकाणी रांग लागल्याचे दिसून आले. शहरातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या भागात खडकी, महानुभाव विधी महाविद्यालय, अंजनापूर, एस. जी. विद्यालय या ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडले होते. काही ठिकाणी अर्धा तर काही ठिकाणी एक तासानंतर मतदान पुन्हा सुरु झाले. कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे ,शहर पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

नेवाशात ६० टक्के मतदान

श्रीरामपूर : शिर्डी लोकसभा मतदार संघातील  नेवासा विधानसभा क्षेत्रामध्ये मतदारांचा उत्साह दिसून आला. तालुक्यात सुमारे ६० टक्के मतदान झाले, तर शहरात ६० टक्के मतदान झाले आहे. दरम्यान मतदानावर बहिष्कार टाकलेला बहिरवाडी गावात ६ वाजेपर्यंत केवळ ५४ म्हणजे ४ टक्के  मतदान झाले.

नेवासे विधानसभा क्षेत्रात  २६९ मतदान केंद्रांपैकी सुमारे १० ते १५  अनेक ठिकाणी सकाळी मतदान सुरू होण्याच्या वेळेस मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्याच्या घटना घडल्या. नेवासा शहर,माका, जळके,कुकाना, मुकिंदपूर,भेंडा या गावातील मतदान यंत्रे बंद पडल्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी अर्धा तासाने तर काही ठिकाणी एक तास मतदान प्रRिया थांबली होती.प्रशासनाने ताबडतोब त्या ठिकाणी उपाययोजना करून मतदान  यंत्र सुरू केली अथवा बदलून  त्या ठिकाणी नवीन मतदान यंत्रे लावण्यात आली.

दरम्यान आज सकाळपासूनच सूर्यदेव कोपला असल्याकारणाने उन्हाचा तडाखा होता. सकाळी उन्हाच्या आत मतदान करण्यासाठी अनेक ठिकाणी रांगा लागलेल्या होत्या, तरीही मतदान केंद्रातील बिघाडामुळे मतदान टक्के वारीवर परिणाम झाला. नऊ  वाजेपर्यंत ७.३४ % मतदान झाले. तालुक्यातील २६९ केंद्रावर असलेल्या २ लाख ५७ हजार ६७८ मतदानापैकी सकाळी ९ वाजेपर्यंत १८ हजार ९०३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर  एक वाजेपर्यंत सुमारे ३२ टक्के मतदान नेवासा तालुक्यात झाले होते, तर दुपारी तीन वाजता अनेक ठिकाणी हा आकडा ५० टक्के यांपर्यंत गेलेला होता.

नेवासा शहरातील स्थानिक उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे संजय सुखदान यांनी नेवासा येथे व कम्युनिस्ट पक्षाचे बन्सी सातपुते यांनी नजीक चिंचोली येथे मतदान केले  व सकाळीच तालुक्यातील व शहरातील मतदान केंद्रांवर  भेटी देऊन कार्यकर्त्यांंत उत्साह वाढवला. शिवसेनेचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांनी देखील दुपारी दोन वाजता नेवासा येथील मतदान केंद्राला भेट देऊ न कार्यकर्त्यांंचा उत्साह वाढवला. नेवासा तालुक्यातील जवळजवळ सर्वच मतदान केंद्रावर आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी भेटी दिल्या. त्यांनी देवगाव येथे मतदान केले, तर ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी व माजी आमदार शंकरराव गडाख  आणि युवा नेते प्रशांत गडाख यांनी सोनई येथे मतदानाचा अधिकार बजावला.

तृतीयपंथीयांचे १०० टक्के मतदान

श्रीरामपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मतदार म्हणून मान्यता मिळाल्याने शहरातील ४२ तृतीयपंथीयांनी मतदानाचा हक्क बजावला. पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. ४२ तृतीयपंथीयांनी मतदान केले.

शहरातील मतदार यादीत ४२ तृतीयपंथीयांची नावे होती. त्यांनी रेल्वे स्थानकासमोरील जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाच्या मतदान केंद्रात मतदान केले. सर्वच्या सर्व म्हणजे ४२ तृतीयपंथी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यापूर्वी त्यांनी नगरपालिका निवडणुकीत मतदान केले होते. मतदान करण्याची ही दुसरी वेळ होती. सर्वोच्च न्यायालयाने मतदानाचा हक्क बहाल केल्याने खूप आनंद झाला. माणूस म्हणून आम्हाला स्वीकारले. देशाच्या जडणघडणीत आमचेही योगदान आहे. मतदान करणे हा लोकशाहीचा उत्सव आहे. आम्ही लोकशाहीचे घटक बनलो आहोत, असे लेखिका दिशा शेख यांनी सांगितले.

मतदानानंतर त्यांनी आमच्याप्रमाणेच अन्य मतदारांनीही घराबाहेर पडून मतदान करावे. लोकशाही सशक्त करण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी स्पष्ट केले. दिशा शेख यांना वंचित बहुजन आघाडीने प्रवक्ता केले आहे. पक्षाने दिलेल्या या संधीबद्दल त्यांनी आभार मानले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 3:53 am

Web Title: lok sabha election 2019 long queue for voting in shirdi
Next Stories
1 जवान चंदू चव्हाणांविरोधात गुन्हा
2 हरिसालमध्ये ‘डॅमेज कंट्रोल’साठी सरकारची धावाधाव
3 मावळमध्ये सरासरी ५२.७४% मतदान
Just Now!
X