जळगाव व धुळे महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी पक्षाने सोपविली होती. दोन्हीकडे भाजपला बहुमत मिळाले. यातही धुळ्यात मोठे आव्हान होते, पण तेही लीलया पार केले. सुजय विखे-पाटील यांनी भेट घेतली. विखे दोन दिवसांत भाजपमध्ये दाखल झाले. रणजितसिंह मोहिते- पाटील यांनीही भेट घेतली. अल्पावधीतच रणजितदादाही भाजपच्या कळपात दाखल झाले. राज्याच्या राजकारणात गिरीश महाजन यांना सध्या भलतेच महत्त्व प्राप्त झाले आहे. पुन्हा भाजप सत्तेत येईल, अशी वातावरणनिर्मिती झाल्याने काँग्रेस आणि ‘राष्ट्रवादी’तील अनेकांना भाजपप्रवेशाचे वेध लागले आहेत. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्यावर काम फत्ते होते, असा संदेश गेला आहे. गिरीशभाऊंना भेटल्यावर पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी भेटलो हे कारण देता येते. सुजय विखे आणि रणजितसिंह यांनी भेटीनंतर हेच कारण दिले होते. या साऱ्या घडामोडींमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गिरीशभाऊंचा धसकाच घेतलाय. त्यांना कोण कोण भेटते यावर विरोधक बारीक नजर ठेवून आहेत. गिरीश महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील. एकनाथ खडसे यांच्यावर गंडांतर आल्यावर खडसेंच्याच जळगाव जिल्ह्य़ातील महाजनांना मुख्यमंत्र्यांनी जवळ केले. त्यांनीही मुख्यमंत्र्यांचा विश्वास सार्थ ठरविला. सरकारवर कोणतेही संकट आले, की गिरीशभाऊ  संकटविमोचकाची भूमिका वठवितात. राजकीय मोहीम फत्ते करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री त्यांच्याच खांद्यावर टाकतात. मग अण्णा हजारे यांचे उपोषण असो वा मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचा नाशिक ते मुंबई लाँग मार्च, गिरीशभाऊ सरकारच्या वतीने मध्यस्थाची भूमिका बजावीत असतात. मुख्यमंत्र्यांचे जवळचे असल्यानेच नोकरशाहीमध्येही महाजनांचे ‘वजन’ वाढलंय. कारण त्यांच्याकडे शब्द टाकल्यास मनाजोगी नियुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा होतो, अशी कुजबुज सध्या मंत्रालयात ऐकू येते. उद्या कदाचित फडणवीसांना दिल्लीत जावे लागलेच तर उत्तराधिकारी म्हणून ते महाजनांचे नाव सुचवतील, अशी चर्चा असते. काही असो, सध्या तरी गिरीशभाऊ फॉर्मात आहेत.

मुंबईवाला