28 September 2020

News Flash

काँग्रेसची फरफट करण्यात राष्ट्रवादीची आघाडी

नगरनंतर दिंडोरीत जागावाटपात धक्का

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

नगरनंतर दिंडोरीत जागावाटपात धक्का

मधु कांबळे, मुंबई : शिवसेना-भाजपचा पराभव करण्यासाठी महाआघाडी तयार करायला निघालेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या जुन्या मित्रपक्षांमध्येच जागावाटपावरून शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे. निर्णायक क्षणीच एकाही जागेची तडजोड करण्यास तयार नसलेल्या राष्ट्रवादीने काँग्रेसची फरफट करण्यात आघाडी घेतली आहे. अहमदनगरनंतर दिंडोरीत उमेदवार जाहीर करून राष्ट्रवादीने काँग्रेसची पंचाईत करून ठेवली आहे.

भाजप-शिवसेनेच्या विरोधातील मतांचे विभाजन होऊ द्यायचे नाही, त्याकरिता लहानात लहान पक्षांनाही बरोबर घ्यायचे, त्यासाठी काही जागांचा त्याग करावा लागला तरी चालेल, अशी भूमिका घेऊन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात महाआघाडी उभारण्याची घोषणा केली. परंतु, प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून एकही जागा सोडली नाही, म्हणून सपने बसपशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे महाआघाडीच्या दारातूनच हे दोन पक्ष निघून गेले.

काँग्रेस-राष्ट्रवादी सोडून माकप, शेतकरी संघटना व बहुजन विकास आघाडी हे तीन पक्ष लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. शेकापने लोकसभा लढणार नाही, असे जाहीर केले आहे. बविकाला पालघरची एकच जागा हवी आहे. माकपने दिंडोरीची जागा मागितली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हातकणंगले एक जागा सोडली आहे. आणखी दोन जागा त्यांना हव्या आहेत, तरीही दोन जागांवर तडजोड करायला तयार आहेत. त्यापैकी राष्ट्रवादीच्या कोटय़ातील बुलडाणा हा मतदारसंघ मागितला होता. मात्र राष्ट्रवादीने बुलडाण्यात माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची उमेदवारी जाहीर करून त्यांच्यापुरता राजू शेट्टींच्या पक्षाला जागा सोडण्याचा विषय संपवून टाकला. काँग्रेसच्या कोटय़ातील वर्धा जागेवरही त्यांनी दावा केला होता; परंतु काँग्रेसने प्रदेश महिला अध्यक्षा चारुशीला टोकस यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेला आणखी एक कोणती जागा द्यायची, असा काँग्रेसपुढे प्रश्न निर्माण झाला आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीसाठी ज्या बैठका झाल्या, त्यात पहिल्या बैठकीपासून नगर मतदारसंघ काँग्रेसने मागितला होता, तर माकपसाठी दिंडोरी मतदारसंघ सोडावा, अशी चर्चा होती. नगर व दिंडोरी हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीच्या कोटय़ातील आहेत. अगदी शेवटच्या क्षणी नगर मतदारसंघ सोडणार नाही, अशी भूमिका घेऊन राष्ट्रवादीने काँग्रेसची पंचाईत करून टाकली. त्याचा परिणाम म्हणजे ज्यांच्यासाठी हा मतदारसंघ मागितला जात होता, त्या काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नगरमध्ये ते भाजपचे संभाव्य उमेदवार मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार संग्राम जगताप यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

दिंडोरी मतदारसंघातून धनराज महाले यांची उमेदवारी जाहीर करून राष्ट्रवादीने काँग्रेसला आणखी एक धक्का दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2019 4:03 am

Web Title: lok sabha election 2019 ncp declared candidates in dindori lok sabha constituency
Next Stories
1 पालघरमध्ये माकपचा बविआला पाठिंबा
2 भाजपची पहिली तुकडी आखाडय़ात
3 किस्से आणि कुजबुज : गिरीशभाऊंचा धसका
Just Now!
X