एजाज हुसेन मुजावर, सोलापूर

एकेकाळी राज्याचे नेते म्हणून ओळखले जाणारे विजयसिंह मोहिते-पाटील यांची अवस्था गेल्या दहा वर्षांत राष्ट्रवादीतील साठमारीच्या राजकारणात केवळ सोलापूर जिल्हास्तरापर्यंतच नव्हे तर स्वत:च्या माळशिरस तालुक्यापर्यंत मर्यादित करण्यात आली होती. मोहिते-पाटील घराण्याचे पंख पद्धतशीरपणे कापण्यात आले. माढा मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात येणार याचा अंदाज आल्याने मोहिते-पाटील यांनी भाजपचे कमळ खांद्यावर घेतले आहे.

ज्येष्ठ नेत्यांच्या आग्रहाखातर शरद पवार यांनी माढय़ातून उभे राहण्याचा निर्णय घेतला खरा; परंतु अवघ्या १५ दिवसांतच त्यांनी माघार घेतली. तद्पश्चात उमेदवारीची माळ पुन्हा खासदार मोहिते-पाटील यांच्या गळ्यात पडण्याची अपेक्षा होती. परंतु उमेदवारीचा तिढा जाणीवपूर्वक कायम ठेवण्यात आला, तेव्हा पक्षात वाढलेली घुसमट विचारात घेता संयमी व शांत स्वभावाचे मोहिते-पाटील आक्रमक झाले आणि त्यांनी स्वत:ऐवजी पुत्र रणजितसिंह यांना उमेदवारी देण्याचा आग्रह धरला. त्यास अर्थातच विरोध झाला. तेवढेच कारण पुरेसे होते. मोहिते-पाटील गटाने राष्ट्रवादीशी असलेला घरोबा मोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मोहिते-पाटील व पवार यांच्यात आता काडीमोड झाल्यामुळे त्याचे दृश्य परिणाम आता सोलापूर जिल्ह्य़ातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात दिसतील. तसे पाहता मोहिते-पाटील आणि पवार यांच्यातील राजकीय संबंध हे कधीही नैसर्गिक स्वरूपाचे नव्हते. ती केवळ तडजोड होती.

काही वर्षांपासून पक्षांतर्गत साठमारीचे राजकारण आणखी वाढले आणि त्यांचा पदोपदी अवमान होऊ लागला. जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वाधिक सदस्य निवडून आले तरी मोहिते-पाटील गटाला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या एकमेव हेतूने जि. प. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने स्वत:चा उमेदवार उभा न करता माढय़ातील अजितनिष्ठ संजय शिंदे (अपक्ष) यांना बिनविरोध निवडून येण्यात मदत केली. भाजपपुरस्कृत महाआघाडीच्या नावाखाली हे राजकारण खेळताना राष्ट्रवादीने एकीकडे मोहिते-पाटील यांना सत्तेत वाटा दिला नाही, तर दुसरीकडे भाजपलाही पद्धतशीरपणे ‘मामा’ बनविले. अलीकडे पक्षात मोहिते-पाटील विरोधकांची मजल एवढी वाढली की त्यांच्याविषयी शिवराळ भाषाही वापरली जाऊ लागली. यातच जिल्हा  बँकेच्या कर्जाची थकबाकी राहिल्याने मोहिते-पाटील यांची अडचण वाढली. हे दुखणे त्यांच्यासाठी त्रासदायक होऊ लागले. यातच पक्षातील कोंडमारा असह्य़ झाल्याने अखेर मोहिते-पाटील यांना ठोस निर्णय घेणे भाग पडले. उशिरा का होईना, भाजपमध्ये गेले तरी मोहिते-पाटील यांचे राजकारण कोणत्या वळणावर चालणार आहे, याचे उत्तर लवकरच मिळेल.