शरद पवारांचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदार संघात भाजपाने सुप्रिया सुळेंविरोधात कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. कांचन कुल या दौंडचे रासपाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी आहेत. याच मतदार संघातून रासपाचे महादेव जानकर यांनी उमेदवारी मागितली होती. भाजपाने महादेव जानकर यांचा पत्ता कापतानाच रासपा आमदाराच्या पत्नीलाच उमेदावारी देत रासपाची कोंडी केली आहे. तर दुसरीकडे कांचन कुल आणि पवार कुटुंबीयांचे कौटुंबिक संबंधदेखील आहे. त्यामुळे कांचन कुल यांना उमेदवारी देऊन भाजपाने एकाच दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा बारामतीत सुरु आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बारामती हा पवारांचा बालेकिल्ला असून शरद पवार यांनी तब्बल सहा वेळा बारामती लोकसभेचे प्रतिनिधित्व केले. पवारांच्या उत्तराधिकारी म्हणून सुप्रिया सुळे यांनी बारामतीची धुरा खांद्यावर घेतली. त्यामुळे या मतदारसंघात भाजपा कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली असून यात बारामतीत भाजपाने कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे.

कांचन कुल या आमदार राहुल कुल यांच्या पत्नी आहेत. कांचन कुल यांचे माहेर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर आहे. कांचन कुल यांचे वडील हे अजित पवार यांच्या पत्नी सुनिता यांचे सख्खे चुलत बंधू आहेत.उस्मानाबाद मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणारे राणा जगजितसिंह हे कांचन यांचे चुलत बंधू आहेत. कांचन यांचा २००५ साली राहुल कुल यांच्याशी विवाह झाला. २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने राहुल कुल यांनी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केला होता. ते सध्या दौंडचे आमदार आहेत. सुशिक्षित चेहरा म्हणून कांचन कुल यांना फायदा होऊ शकतो.

जानकरांचाही पत्ता कट

मराठा आणि धनगर समाजाचे प्राबल्य असणाऱ्या बारामती लोकसभा क्षेत्रात बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, खडकवासला आणि भोर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. २०१४च्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे रिंगणात होते. अटीतटीच्या या लढतीत सुळे या ६९ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाल्या. मतदारसंघातील सहापैकी तीन विधानसभेच्या क्षेत्रात जानकरांनी आघाडी घेतली होती. मात्र, बारामती, इंदापूर विधानसभेतून मिळालेल्या निर्णायक आघाडीमुळे सुप्रिया सुळे यांचा पराभव टळला. जानकरांना कमळ चिन्ह न घेण्याचा अट्टहास महागात पडला, असे सांगितले जाते. यंदा देखील जानकर या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र, भाजपाने त्यांना उमेदवारी न देता त्यांच्याच पक्षातील आमदाराच्या पत्नीस उमेदवारी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha election 2019 ncp supriya sule vs bjp kanchan kul
First published on: 23-03-2019 at 12:08 IST