राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचा जो दारुण पराभव झाला, त्याला वंचित बहुजन आघाडीही कारणीभूत ठरली आहे. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांना धक्का दिला आहे. वंचित आघाडीमुळे भाजप-शिवसेना विरोधी मतांचे मोठय़ा प्रमाणावर विभाजन झाल्यामुळे माजी मुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे या नेत्यांचा तर थेट पराभव पत्करावा लागला आहे. त्याचबरोबर आणखी सात-आठ मतदारसंघात काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना आघाडीचा फटका बसला आहे.

सर्वच मतदारसंघात वंचित आघाडीच्या उमेदवारांना दखलपात्र मते मिळाली आहेत. आठ ते दहा मतदारसंघात तर आघाडीच्या उमेदवारांनी आश्चर्यकारिकरित्या प्रचंड मते घेतल्याने, त्याचा फटका काँग्रेस, राष्ट्रवादी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवारांना बसला आहे.

लोकसभेच्या मागील निवडणुकीत राज्यात काँग्रेसचे पानिपत झाले होते, मात्र अशोक चव्हाण व राजीव सातव हे दोन उमेदवार निवडून आले होते, त्यामुळे काँग्रेसची कशीबशी लाज राखली गेली होती. परंतु या वेळी प्रदेशाध्यक्ष असलेल्या चव्हाण यांनाच भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांच्याकडून  पराभव पत्करावा लागला आहे, त्याचे मुख्य कारण वंचित आघाडी आहे. चिखलीकर यांना पन्नास हजाराची आघाडी होती, त्याच वेळी वंचित आघाडीचे उमेदवार यशपाल भिंगे यांनी दीड लाखाच्या वर मते घेतली. त्यामुळे चव्हाण यांचा पराभव झाला.

सोलापूरमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी मोठी हवा केली होती. आंबेडकर यांनी दीड लाखाहून अधिक मते घेतल्याने सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला. या अटतटीच्या लढतीत आंबेडकर-शिंदे यांच्या मतविभाजनात भाजपचे सिद्धेश्वर महाराज यांनी बाजी मारली. अकोला मतदारसंघात या वेळी प्रकाश आंबेडकर दुसऱ्या क्रमांकावर राहिले. काँग्रेस तिसऱ्या स्थानावर होते. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसमुळे आंबेडकरांचा पराभव झाल्याचे मानले जात आहे. त्याचा फायदा भाजपचे संजय धोत्रे यांना झाला.

बुलढाणा मतदारसंघात शिवसेनेचे प्रताप जाधव यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी कडवे आव्हान दिले होते. परंतु वंचित आघाडीचे बाळासाहेब शिरसकर यांनी दीड लाखाहून अधिक मते घेतल्याने शिंगणे यांना पराभवाचा फटका बसला. गडचिरोली-चिमूर मतदारसंघात आघाडीच्या उमेदवार रमेशकुमार गजबे यांनी लाखाच्या वर मते घेतली. त्यामुळे काँग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी पराभूत झाले व भाजपचे अशोक नेते यांचा विजय सुकर झाला. हिंगोली मतदारसंघातही वंचित आघाडीचे मोहन राठोड यांनी सव्वा लाखाच्या आसपास मते घेतल्यामुळे शिवसेनेचे हेमंत पाटील यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. मतविभाजनाचा फटका काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांना बसला.

परभणीतही अलगीर खान यांनी एक लाखाच्या वर मते घेतली त्यामुळे राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांचा विजय थोडक्यात हुकला. शिवसेनेचे संजय जाधव यांनी तेथे बाजी मारली आहे. सांगली मतदारसंघात वंचित आघाडीचे गोपीचंद पडळकर यांनी दोन लाखांच्या वर मतांची आघाडी घेतली. त्याचा फटका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील यांना बसला आणि भाजपचे संजयकाका पाटील हे दुसऱ्यांदा विजयी झाले. यवतमाळ, हातकणंगले, अमरावती, लातूर या मतदारसंघातही वंचित आघाडीने लक्षणीय मते घेतली आहेत. औरंगाबाद मतदारसंघात वंचित आघाडीचा मित्र पक्ष एमआयएमचे इम्तियाज जलील यांची विजयाकडे घोडदौड सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने वंचित आघाडीला बरोबर घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु जागा वाटपावरून आघाडी फिसकटली. त्यामुळे आंबेडकर यांनी स्वबळावर निवडणुका लढण्याचे घोषित करून राज्यातील सर्व मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. आंबेडकर अकोला व सोलापूर या दोन मतदारसंघातून निवडणूक लढले.