शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीतील निर्णय

अकोला : लोकसभा निवडणुकीत शेतकरी संघटना स्वतंत्रतावादी पक्ष, विदर्भ निर्माण महासंघ व स्वतंत्रता वादी अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देणार आहे. युती किंवा आघाडीला कुठेही पाठिंबा देणार नसल्याची घोषणा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी अकोल्यात पत्रकार परिषदेत केली.

अकोल्यात झालेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत संघटनेची अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आली. देशातील प्रमुख पक्षांनी सत्ता उपभोगली आहे. मात्र, समाजवादी व्यवस्था बदलायला ते तयार नाहीत. त्यामुळे समाजवादी व जातीयवादी पक्षांना पाठिंबा न देण्याचा व मतदान न करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दोन्ही प्रस्थापित आघाडय़ांनी शेती विरोधी धोरणे राबवून शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले. त्यामुळे शेतकऱ्यांना या पक्षांना मतदान करू नये, असे आवाहन अनिल घनवट यांनी केले.

देशामध्ये दोनच स्वतंत्रतावादी पक्ष आहेत. स्वतंत्र भारत पक्ष व स्वर्ण भारत पक्ष या पक्षांना शेतकरी संघटनेने बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. शेतकरी संघटनेचा छोटय़ा राज्यांच्या निर्मितीस पाठिंबा आहे. त्यामुळे विदर्भ निर्माण महासंघाला पाठिंबा देण्यात आला. स्वतंत्रतावादी विचाराच्या अपक्ष उमेदवारांनाही शेतकरी संघटना पाठिंबा देईल, असे अनिल घनवट यांनी स्पष्ट केले.

शेती धोरणाच्या मुद्दय़ावर निवडणूक व्हावी

देशाला जातीयवादी, समाजवादी, भ्रष्ट पक्ष व उमेदवारांना शेतकरी संघटना मदत करणार नाही. योग्य उमेदवार नसेल तर जनतेने आपला नकार नोंदवावा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. ही निवडणूक शेती धोरण याच मुद्दय़ावर व्हावी, यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावे व आपल्या मतांचे महत्त्व निर्माण करण्याच्या संधीचा फायदा घेतला पाहिजे, असे मत शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी बैठकीत व्यक्त केले.