मेघना बोर्डीकर यांची  माघार

परभणी : शिवसेनेने आज राज्यभरातील २१ उमेदवारांच्या जाहीर केलेल्या यादीत परभणी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी अपेक्षेप्रमाणे खासदार संजय जाधव यांनाच जाहीर झाली असून काही दिवसांपूर्वी स्वतंत्रपणे लढण्याचा मेघना साकोरे बोर्डीकर यांचा इरादाही आता मावळला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आज झालेल्या चच्रेनंतर निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असून निवडणुकीच्या लढाईतून माघार घेतली असली तरी विकासाची लढाई सुरूच राहील, असेही बोर्डीकरांच्या वतीने सांगण्यात आले.

परभणीची जागा युतीत शिवसेनेच्या वाटय़ाला असून कोणत्याही परिस्थितीत शिवसेना या मतदारसंघावरील आपला हक्क सोडणार नाही, हे स्पष्ट असताना काही दिवसांपूर्वी मेघना साकोरे बोर्डीकर यांनी निवडणूक लढविण्याचे कार्यकर्त्यांच्या बठकीत स्पष्ट केले होते.

कोणत्याही परिस्थितीत परभणीची जागा भाजपला जाणार नाही हे उघड असताना या पद्धतीने भूमिका घेण्यामागचे त्यांचे राजकारण समजू शकले नाही. कार्यकर्त्यांच्या भावना नेत्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी एक बैठकही घेतली. या बठकीतही ‘जर-तर’ची वक्तव्ये झाल्याने मेघना यांच्या निवडणूक लढविण्याविषयीच मोठय़ा प्रमाणात संभ्रम होता. मात्र या बठकीनंतर शिवसेनेच्या वतीने समन्वयक म्हणून अर्जुन खोतकर येथे आले आणि त्यांनी बोर्डीकरांशी चर्चा केली. त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून बोर्डीकरांचे बोलणे करून दिले. त्यानुसार शुक्रवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या वेळी खोतकरांसह खासदार संजय जाधव, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, मेघना बोर्डीकर, रामप्रभु मुंढे, विठ्ठल रबदडे, रंगनाथ सोळंके, परभणी जिल्ह्यातील भाजपचे काही पदाधिकारी व कार्यकत्रे या वेळी उपस्थित होते. परभणीची जागा शिवसेनेची असताना या जागेवर आपल्याला लढता येणार नाही. त्यामुळे प्राप्त परिस्थितीत आपण शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी परिश्रम घ्या, असे या वेळी मुख्यमंत्र्यांनी बोर्डीकरांना सांगितले.

आज दुपारी शिवसेनेच्या वतीने खासदार जाधव यांची उमेदवारी पक्षाने घोषित केली.

कार्यकर्त्यांची बैठक घेण्यापूर्वी खुद्द मेघना बोर्डीकर याच शिवसेनेच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात होते. खासदार जाधव यांनी ही निवडणूक लढवणे किती खडतर आहे, याचे प्रात्यक्षिकही ‘मातोश्री’वर सांगितले गेले. जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघामध्ये जाधव यांना कसा विरोध होत आहे आणि अशा परिस्थितीत मेघना बोर्डीकर यांची उमेदवारीच कशी प्रबळ राहील असाही युक्तिवाद एका गटाच्या वतीने ‘मातोश्री’वर करण्यात आला. मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच खासदार जाधव यांच्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली होती. त्यामुळे सेनेच्या संभाव्य उमेदवार म्हणून काही दिवस चाललेले मेघना बोर्डीकर यांचे नावही शिवसेनेच्या वर्तुळातून आपोआपच मागे पडले.

जिंतूर विधानसभेसाठी गुंतवणूक

परभणीची जागा शिवसेनेची असल्याने ती कदापिही भारतीय जनता पक्षाच्या वाटय़ाला येणार नाही. मात्र या वेळी शिवसेनेवर दबाव टाकून तसेच भाजपच्या पक्षनेतृत्वाचे लक्ष वेधून सेलू-जिंतूर विधानसभा मतदारसंघ युतीत भाजपसाठी सोडवला जावा यासाठी ही खेळी असल्याचेही सांगण्यात येते. अर्थात युतीत हा मतदारसंघ भाजपला सोडण्यासाठी शिवसेना तयार होईल हे सुद्धा लोकसभेनंतर लगेच स्पष्ट होणार आहे.

मात्र कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पक्षनेतृत्वाचे लक्ष वेधून घेण्यासाठी बोर्डीकरांनी केलेला प्रयत्न हा जिंतूर विधानसभेसाठी गुंतवणूक असल्याचेही बोलले जात आहे.