उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीकडून राणा जगजीतसिंह

उस्मानाबाद : उमेदवारी दाखल करण्यासाठी अवघ्या तीन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना शिवसेनेने विद्यमान खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना डच्चू देत माजी आमदार ओम राजेनिंबाळकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली. ओमराजे यांच्या उमेदवारीची घोषणा होताच राष्ट्रवादी काँग्रेसनेही दोन जागांवरील उमेदवार जाहीर केले. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी राणा जगजीतसिंह पाटील तर माढा मतदारसंघातून संजय शिंदे यांची नावे जाहीर झाली. शिवसेना उमेदवाराचे नाव जाहीर झाल्यानंतर उस्मानाबाद शहरात शिवसनिकांनी फटाक्यांची आतषबाजी केली, तर उमरगा तालुक्यातून मात्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

सोलापूर, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा मिळून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची रचना आहे. ११ तालुक्यांचा प्रतिनिधी म्हणून आगामी खासदार लोकसभा सभागृहात पाठविला जाणार आहे. यासाठी होत असलेल्या निवडणुकीतील लढतीचे चित्र शुक्रवारी स्पष्ट झाले आहे. शिवसेनेने लोकसभेसाठी माजी आमदार ओम राजेिनबाळकर यांना उमेदवारी बहाल केली आहे.

उस्मानाबाद मतदारसंघातील उमरगा, औसा व बार्शी या विधानसभा मतदारसंघात लिंगायत समाजाचे मतदान अधिक आहे. राष्ट्रवादीतून इच्छुक असणारे माजी मंत्री दिलीप सोपल यांना उमेदवारी दिली असती तर निवडणुकीचा प्रचार जातीय अंगाने पुढे गेला असता. त्यामुळे राणा जगजीतसिंह पाटील यांना उमेदवारी दिली गेल्याचे राष्ट्रवादीच्या सूत्रांनी सांगितले.

उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ओम राजेिनबाळकर व विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांच्यापैकी एकाला मातोश्रीवरून उमेदवारी बहाल केली जाणार होती. उमरगा-लोहारा तालुक्यातील सेनेचे पदाधिकारी वगळता अन्य तालुक्यातील सेनेच्या दुसऱ्या गटाचा गायकवाड यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध होता. शेवटी सेनेने गायकवाडांना डच्चू देत ओमराजेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातल्याचे जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी उस्मानाबादेत आतषबाजी करीत या उमेदवारीचे स्वागत केले. मात्र जिल्ह्यात उमरगा-लोहारा या तालुक्यात सेनेचे प्राबल्य असतानाही गायकवाड यांना उमेदवारीपासून दूर ठेवल्याने दोन्ही तालुक्यात नाराजी पसरली आहे.

खासदार गायकवाड यांची ओळख शिवसेनेमध्येच ‘नॉट रिचेबल’ अशी होती. तशा तक्रारी मातोश्रीवर  करण्यात आल्या. त्याचा परिणाम म्हणून गायकवाड यांना उमेदवारी नाकारण्यात आली.