स्वबळाची भाषा आणि राजीनाम्याची धमकी दिल्यानंतर शिवसेनेने अखेर भाजपाशी युती केली असून आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना २३ आणि भाजपा २५ जागांवर निवडणूक लढणार आहे. भाजपाशी युती केल्याने शिवसेनेवर सध्या सोशल मीडियावरुन टीकेची झोड उठली आहे. मात्र, या युतीमुळे खरंच शिवसेना आणि भाजपाचा फायदा होईल का आणि यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत युतीमुळे दोन्ही पक्षांना किती जागांवर विजय मिळाला होता, याचा घेतलेला हा आढावा…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेना – भाजपाची पहिल्यांदा युती कधी ?
१९८४ मध्ये शिवसेनेचे दोन उमेदवार (यात मनोहर जोशींचा समावेश होता) भाजपाच्या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले. या दोन्ही उमेदवारांचा पराभव झाला. यानंतर चार वर्ष दोन्ही पक्षांकडून फारसे प्रयत्न झाले नाही. मात्र, १९८९ मध्ये शिवसेना आणि भाजपाने पहिल्यांदा अधिकृतरित्या युती केली. हिंदुत्वच्या मुद्द्यावर ही युती झाली होती. या युतीचे श्रेय प्रमोद महाजन यांना दिले जाते. प्रमोद महाजन यांनी राज्यात पुढाकार घेतला आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संपर्क साधून शिवसेना – भाजपा युती केली. लोकसभा निवडणुकीत भाजपा मोठा भाऊ तर राज्यात शिवसेना मोठा भाऊ, असे या युतीचे सूत्र होते .युतीमध्ये कटुता निर्माण झाली असली तरी दोन्ही पक्षांनी लोकसभा निवडणुकांना एकत्र सामोरे जाण्याचा निर्णय कायम ठेवला.

शिवसेना – भाजपा युतीची २००९ पर्यंतची कामगिरी (लोकसभेत दोन्ही पक्षांनी जिंकलेल्या जागा)

वर्ष            भाजपा       शिवसेना
१९८९           १०                 १
१९९१            ५                  ४
१९९६           १८               १५
१९९८             ४                  ६
१९९९           १३               १२
२००४           १३               १२
२००९             ९               ११

भाजपा- शिवसेनेची २०१४ मधील कामगिरी ? 

२०१४ मध्ये भाजपाने २६ तर शिवसेनेने २२ जागा लढवल्या होत्या. यातील २३ जागांवर भाजपा तर शिवसेनेचा १८ जागांवर विजय झाला होता.

मतांची टक्केवारी काय होती ?
२०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपाला एकूण २७. ५६ टक्के मते मिळाली होती. तर शिवसेनेला २०. ८२ टक्के मते मिळाली होती. तर काँग्रेसला १८. ०२ टक्के आणि राष्ट्रवादी काँग्रेसला १६. ०२ टक्के मते मिळाली होती. २०१९ युतीचा फायदा दोन्ही पक्षांना होईल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससमोरील अडचणी वाढल्या आहेत.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha election 2019 statistics of shiv sena bjp alliance
First published on: 19-02-2019 at 14:03 IST