सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी राज्यातील सर्व ४८ जागा बसपा स्वबळावर लढविणार असल्याची माहिती पक्षाचे राज्याचे प्रभारी अ‍ॅड. संजीव सदाफुले यांनी सोलापुरात दिली. सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघात काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे असोत वा भाजपचे कोणीही असोत, त्यांच्या विरोधात चिवटपणे बसपा लढणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

सोमवारी दुपारी येथील शासकीय विश्रामगृहात बसपाची बैठक झाली. या वेळी अ‍ॅड. सदाफुले यांच्यासह पक्षाचे दुसरे प्रभारी प्रा. ना. तु. खंदारे यांनी मार्गदर्शन केले. पक्षाचे सर्वेसर्वा मायावती यांनी महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढविण्याचा आदेश दिला आहे. राज्यात आतापर्यंत बसपा सत्तेवर आला नसला तरी आतापर्यंत राज्यात आपला पक्ष लोकसभा वा विधानसभा अशा कोणत्याही निवडणुकांमध्ये पराभूत होत आला असला तरी आता मात्र इतर प्रमुख पक्षांचे उमेदवार पाडण्याची ताकद आमच्या पक्षाने निर्माण केली आहे. निवडणुकीच्या राजकारणात कालपर्यंत आमचा पक्ष पराभूत होत होता. आता दुसऱ्या पक्षाच्या बडय़ा बडय़ा नेत्यांना पाडू शकतो. याच वाटचालीत आगामी काळात आमचा पक्ष राज्यात प्रमुख सत्ताधारी म्हणून उदयास आल्याशिवाय राहणार नाही, असाही दावा अ‍ॅड. सदाफुले यांनी केला.

आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये बसपा ताकदीनिशी उतरणार आहे. त्यासाठी सर्व जाती-धर्माच्या घटकांना सोबत घेतले जाईल. पक्षाने दिलेले उमेदवार  तन-मन-धनाने आणि चिकाटीने लढतील. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले. पक्षप्रमुख मायावती जेव्हा पक्षाचे उमेदवार जाहीर करतील, तेव्हा त्या क्षणापासून पक्ष कार्यकर्त्यांनी पक्षाच्या प्रचाराचा जोर वाढवावा, असेही आवाहन त्यांनी केले. पक्षाच्या प्रचाराची रूपरेषा लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे अ‍ॅड. सदाफुले यांनी सांगितले. या बैठकीस पक्षाचे प्रदेश सचिव बबलू गायकवाड, सोलापूर महापालिकेतील बसपाचे गटनेते आनंद चंदनशिवे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद बनसोडे, शहराध्यक्ष देवा उघडे, नगरसेवक गणेश पुजारी, ज्योती बमगोंडे, स्वाती आवळे आदींची उपस्थिती होती.