News Flash

लोकसभा निवडणुकीची नगरमध्ये आतापासूनच तयारी

गांधी हे पक्षाची उमेदवारी मिळणार असे स्पष्ट करीत आहेत.

bjp, gram panchayat election election, truth is different,marathi news, marathi, Marathi news paper
( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

लोकसभा निवडणुकीला वेळ असला तरी नगर जिल्ह्य़ाच्या दक्षिण भागातील राजकीय वातावरण आतापासूनच तापू लागले असून, एकमेकांना शह देण्यासाठी नेतेमंडळी सरसावले आहेत. खासदारकीसाठी अनेक इच्छुक असून, नवनवीन नावे पुढे येऊ लागली आहेत.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सध्या भारतीय जनता पक्षाचे खासदार दिलीप गांधी हे करतात. त्यांना पक्षांतर्गत गटबाजीला तोंड द्यावे लागत आहे. गांधी हे पक्षाची उमेदवारी मिळणार असे स्पष्ट करीत आहेत. तर काँग्रेस पक्षाचे नेते व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे हे निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्या दृष्टीने त्यांनी तयारीही सुरू केली आहे. प्रत्येक तालुक्यात संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांच्या याद्या तयार केल्या जात आहेत. विखे यांनी त्यांच्या नगर शहरानजीक असलेल्या विळद घाटातील शैक्षणिक संकुलात मुख्य कार्यालय व वॉररूम सुरू केली आहे. विखे हे काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी करणार की अन्य पक्ष, अपक्ष हे अद्याप गुलदस्त्यात आहे. डॉ. विखे यांना भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी भाजप प्रवेशाचे निमंत्रण दिले, उमेदवारी देण्याचे सूतोवाच केले. विरोधी पक्षनेते विखे यांनी तो मुद्दा टोलवून लावला, पण डॉ. सुजय विखे यांनी त्यावर मौन बाळगले. खासदार गांधी यांची मात्र त्यात कोंडी होत आहे. त्यांनी कर्डिले हे गमतीने बोलले असे सांगितले. त्यांनी टीका-टिप्पणी न करता गप्प बसणे स्वीकारले आहे. आपली करमणूक होत असल्याचे गांधी हे जाहीररीत्या सांगत आहेत.

अद्याप पक्षीय पातळीवर लोकसभेची तयारी सुरू झालेली नाही. पक्षाचे त्यासंदर्भात कोणतेही धोरण नाही. राज्याच्या अन्य जिल्ह्य़ात राजकीय हालचाली नाहीत, पण नगर जिल्ह्य़ात मात्र आतापासून निवडणुकीचे वारे वाहत आहेत. पक्षाचे नेते, पदाधिकारी यांनी संकेत दिलेले नाहीत, पण जिल्ह्य़ात मात्र आता सर्वच पक्षाचे नेते डावपेच खेळत आहेत, त्यात आता डॉ. विखे व खासदार गांधी यांच्याबरोबर राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षाचे नेतेही उतरले आहेत. राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनीही लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांचे भाचे, तर माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे ते चिरंजीव आहेत. विखे व तनपुरे या प्रभावशाली राजकीय कुटुंबात फारसे सख्य नाही. आता तिसऱ्या पिढीतही संघर्ष सुरू झाला आहे. डॉ. विखे यांना शह देण्यासाठी तनपुरे यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली.

लोकसभा निवडणूक काँग्रेस व राष्ट्रवादी हे एकत्र लढविणार की स्वतंत्र हे स्पष्ट झालेले नाही. एकत्र लढल्यास जागावाटपाचा तिढा निर्माण होऊ शकतो. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती, पण आता राजकारण खूप बदललेले आहे. राष्ट्रवादीकडून माजी आमदार दादाभाऊ कळमकर हेदेखील इच्छुक आहेत. इच्छुकांच्या संख्येत आणखी भर पडणार आहे. केवळ एकमेकांना शह देण्यासाठी उमेदवारासाठी नावे पुढे केली जात आहेत. आता या राजकीय कुरघोडीत शिवसेना उतरली आहे. सेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार उभा करणार असल्याचे जाहीर केले. सेनेचे राठोड यांचा पराभव भाजपच्या मतविभागणीमुळे झाला होता. भाजपाचे काही कार्यकत्रे हे नेहमी राठोड यांना राजकीय त्रास देतात. आता भाजपची कोंडी करण्याकरिता राठोड यांनी सेनेच्या उमेदवारीची घोषणा केली. डॉ. विखे सोडले तर अन्य पक्ष किंवा त्यांच्या इच्छुक उमेदवारांनी अद्याप तयारी सुरू केलेली नाही, पण एकमेकांना शह देण्यासाठी डावपेच खेळण्यास सुरुवात झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2017 1:27 am

Web Title: lok sabha elections preparation in nagar
Next Stories
1 महामंडळावर नियुक्तीसाठी चांगल्या कार्यकर्त्यांची वानवा
2 भीमाशंकर देवस्थानासाठी १४० कोटी रुपयांचा पर्यावरणस्नेही विकास आराखडा
3 भाजपाच्या काळात ३०७ सिंचन प्रकल्पांमध्ये ४० हजार कोटींचा घोटाळा: राष्ट्रवादी काँग्रेस
Just Now!
X