नालासोपाऱ्यात ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’चे आयोजन

वसई-विरार शहराची लोकसंख्या वाढत असतानाच आरोग्यासंबंधी विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. महापालिकेने मोफत आरोग्य सेवा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असला तरी आरोग्यासंबंधी विविध समस्यांचे निराकरण करण्यात महापालिकेला अपयश आले आहे. वसई-विरारमधील आरोग्यासंबंधी समस्यांचा वेध घेण्यासाठी नालासोपाऱ्यात शुक्रवार, २० डिसेंबर रोजी ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नालासोपारा पूर्वेच्या दामोदर सभागृहात हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमासाठी वसई-विरार महापालिकेतील महत्त्वाचे अधिकारी आणि वैद्यकीय व आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ  उपस्थित राहणार आहेत. आरोग्य क्षेत्रात काम करणारे रुग्णमित्रही यावेळी आपली भूमिका मांडणार आहेत.

सध्या वसई-विरार शहराची लोकसंख्या २५ लाखांवर गेली आहे. या वाढत्या लोकसंख्येला आरोग्य सेवा पुरवण्याचे काम वसई-विरार महापालिका करत आहे. महापालिकेने आरोग्य सेवा मोफत करण्याचा मोठा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी सुरू केली. महापालिकेकडे दोन रुग्णालय असून ९ प्राथमिक दवाखाने, २१ आरोग्य केंद्र आणि ३ माता बालसंगोपन केंद्रे आहेत. त्याद्वारे महापालिका नागरिकांना आरोग्य सेवा पुरवण्याचे काम करत आहेत.

मात्र नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावत आहेत. सतत पसरणारे साथीचे आजार, विविध आजारांची होणारी लागण यामुळे नागरिक त्रस्त आहेत. पालिकेच्या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. खाजगी डॉक्टरांकडून लूट सुरू आहे. शहरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झालेला आहे. या समस्या रोखण्याचे आव्हान पालिकेच्या आरोग्य विभागापुढे आहे. पालिकेकडे औषध साठा पुरेसा असतो का, आरोग्य यंत्रणा एवढय़ा मोठय़ा लोकसंख्येसाठी सक्षम आहे का? हिवताप, डेंग्यू यांसारख्या आजारांवर पालिका कसे नियंत्रण मिळवते, नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी पालिका काय उपाययोजना करते, विविध आरोग्य कल्याणकारी योजना पालिका कशा पद्धतीने राबवते याची माहिती या  कार्यक्रमाद्वारे नागरिकांना मिळणार आहे.

महापालिकेतर्फे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि अन्य अधिकारी आपली भूमिका मांडणार असून नागरिकांच्या सूचनांची अंमलबजावणी केली जाणार आहे. नागरिकांना आपले प्रश्न लेखी स्वरूपात सादर करता येतील, तसेच प्रत्यक्ष कार्यक्रमात अधिकाऱ्यांसमोर मांडता येणार आहेत. नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांचा पाठपुरावा ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून केला जाणार आहे.

‘लोकसत्ता’तर्फे शहरातील विविध नागरी समस्या सोडवण्यासाठी, नागरिकांना त्यांच्या तक्रारी मांडण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यापूर्वी शहरातील वीज समस्या, पूरपरिस्थिती, वाहूतक कोंडी, अनधिकृत फेरिवाल्यांच्या समस्या आदी प्रश्नांवर ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कधी? – शुक्रवार, २० डिसेंबर

कुठे? – दामोदर सभागृह, नालासोपारा (पू). सायंकाळी : ६ वाजता