केंद्रामध्ये लोकपाल नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता राज्यातील लोकयुक्ताची प्रक्रिया सुरू असून त्याचा मसुदा अंतिम टप्प्यात आला आहे. २८ जून रोजी मुंबईत होणाऱ्या बैठकीत मसुद्याला अंतिम स्वरूप दिले जाईल, अशी माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी येथे बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. आगामी अधिवेशनात त्याला मंजुरी मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

देशांमध्ये लोकपाल आणि राज्यांमध्ये लोकायुक्त नियुक्त व्हावा आणि सामान्यांना अधिकार प्राप्त व्हावेत यासाठी अण्णा हजारे हे गेल्या आठ वर्षांपासून आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला यश मिळाले आहे. केंद्रामध्ये लोकपालची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता राज्यातील लोकयुक्ताची प्रक्रिया सुरू आहे. आज हजारे हे कोल्हापुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या लोकायुक्त प्रक्रियेबाबत भूमिका स्पष्ट केली.

राज्याच्या लोकायुक्त नियुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यीय समिती तयार करण्यात आली आहे. या समितीमध्ये पाच सरकारचे सदस्य आणि पाच आमच्या सदस्यांचा समावेश आहे. सध्या या समितीचा मसुदा बनवायचे काम सुरू आहे. येत्या २८ जून रोजी याबाबत मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीनंतर येत्या अधिवेशनात लोकायुक्त नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर येत्या दीड वर्षात राज्याची परिस्थितीत बदल होईल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

राजू शेट्टी यांच्या पराभवाबद्दल विचारले असता त्यांनी शेट्टी यांचा पराभव मान्य नसल्याचे सांगत चळवळीतल्या कार्यकर्त्याचा कधीच पराभव होत नसतो, असे मत व्यक्त केले. आज छत्रपती शाहू महाराजांची जयंती असून त्यांनी चरित्र संपन्न परिवर्तनाची चळवळ यशस्वी केली. चारित्र्य चांगले असेल तर चळवळ यशस्वी होते. त्यामुळे सध्या देशाला चारित्र्यशील नेतृत्वाची गरज असल्याचे असल्याचे हजारे यांनी सांगितले.