आमचं युपीएचं सरकार आल्यावर २००९ मध्ये जशी कर्जमाफी केली तशी या देशातील शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी करण्याचे आश्वासन खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिले. बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आणि पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. या सभेत भाजप, मोदी आणि फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला.

भाजपाने पाच वर्षांत काम न करता नुसती आश्वासने दिली. काहीच काम नसल्यामुळे वैयक्तिक टिका करण्याचा सपाटा लावला आहे. ही आमच्या कुटुंबाची निवडणूक नाही तर ही देशाची, देशातील शेतकर्‍यांची निवडणूक आहे असेही सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले. आपल्या हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या मुकबधीर आंदोलकांवर राज्याच्या गृहमंत्र्यांनी लाठीचार्ज केला. तुम्ही एक बोट आमच्याकडे दाखवता त्यावेळी तीन बोटं तुमच्याकडे राहतात हे लक्षात घ्या असा इशारा सुप्रियाताई सुळे यांनी अपरोक्ष मुख्यमंत्र्यांना दिला.

आमच्या आबांनी आया बहिणींचे संसार उध्वस्त होवू नये म्हणून राज्यातील डान्सबार बंद केले परंतु भाजप सरकारने हेच डान्सबार पुन्हा सुरु केले आहेत. ही सत्याची व असत्याची लढाई आहे. आपण सत्याचा मार्ग अवलंबला आहे असेही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या. यावेळी त्यांनी औषधांच्या किमती वाढल्या, गॅससिलेंडरचे दर वाढले आहेत याची आठवण करून देताना आता दारात येणार्‍या भाजपवाल्यांना लांबुनच नमस्कार करा असे आवाहन केले.

उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी, पार्थ पवार आदींसह महाआघाडीचे नेते व्यासपीठावर उपस्थित होते.