26 September 2020

News Flash

राज यांच्या सभांचा खर्च मागण्याचा अधिकार नाही – शरद पवार

शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा सरकारवर टीका केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लोकसभा निवडणूकीच्या चारही टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात सभा घेतल्या. प्रचारादरम्यान राज ठाकरेंनी मोदी-शाह या जोडगोळीचा चांगलाच समाचार घेतला होता. याबाबत राज ठाकरे यांची निवडणूक आयोगाकडे भाजपाकडून तक्रारही करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने देखील मनसेला नोटीस पाठवण्याची हालचाल सुरु केल्याचं वृत्त आहे. मात्र, या सभांबाबत राज ठाकरे यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठराखण केली आहे. मनसेने लोकसभेसाठी उमेदवारच न दिल्याने निवडणूक आयोगाला त्यांना हिशोब मागण्याचा अधिकार नाही. एखाद्या पक्षाने कोणताही उमेदवार उभा न करता सभा घेतल्या तर तो त्याचा लोकशाही अधिकार असल्याचं पवार यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईत पक्षाच्या बैठकीनंतर बोलताना शरद पवार यांनी राज ठाकरे यांची पाठराखण केली आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, मनसेने लोकसभेसाठी उमेदवारच न दिल्याने निवडणूक आयोगाला त्यांना हिशोब मागण्याचा अधिकार नाही. एखाद्या पक्षाने कोणताही उमेदवार उभा न करता सभा घेतल्या तर तो त्याचा लोकशाही अधिकार आहे. १९७७ मध्ये आणीबाणीविरोधात निवडणुकीदरम्यान पु.ल. देशपांडे यांनी राज्यभर काँग्रेसविरोधात प्रचार सभा घेतल्या होत्या. त्यावेळी आयोगाने हिशेब मागितला नव्हता. सभा घेण्याचा सर्वानाच अधिकार आहे. त्यामुळे सभांच्या खर्चाचा हिशेब मागण्याचा आयोगाला काय अधिकार, असा सवाल पवार यांनी केला.

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने राज ठाकरेंच्या त्या सभांचा खर्च हा मनसे पक्षाच्या खर्चात गृहीत धरला जाईल, असं स्पष्ट केले आहे. शिवाय या खर्चाचा तपशीलही मनसेला आयोगाला सादर करावा लागणार आहे, अशी माहिती अतिरिक्त निवडणूक आयुक्त दिलीप शिंदेंनी दिलीय.

शरद पवार यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा सरकारवर टीका केली. राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर असूनही सरकारने अजूनही हा प्रश्न गांभीर्याने घेतलेला नाही. परतीचा पाऊस पडला नाही तेव्हाच दुष्काळ जाहीर व्हायला हवा होता. मात्र सरकारने विलंब केला. आताही लोकांना मदत मिळत नसून दुष्काळी उपाययोजनांमध्ये सरकार अपयशी ठरल्याचा ठपका त्यांनी भाजप सरकारवर ठेवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2019 8:21 am

Web Title: loksabha election 2019 ncp chief sharad pawar support mns chief raj thackeray
Next Stories
1 रामलल्लाचे दर्शन टाळल्याने अयोध्यावासी मोदींवर नाराज
2 मंदिर उभारणीची घटिका समीप आली
3 अखेरचे टप्पे भाजपसाठी महत्त्वाचे
Just Now!
X