‘ब्लॉग बेंचर्स’ स्पध्रेत राज्यात प्रथम आलेल्या पीयूषचे मनोगत
विद्यार्थ्यांना लिहिते करण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ब्लॉग बेंचर्स या स्पध्रेच्या माध्यमातून आपल्याला निर्भिडपणे भूमिका मांडण्याची संधी मिळाली, हा अनुभव आयुष्यभर आठवणीत राहणारा आहे. ‘लोकसत्ता’ हे अभिव्यक्तीचे सशक्त व्यासपीठ आहे, असे मत ब्लॉग बेंचर्स स्पध्रेत महाराष्ट्रातून प्रथम आलेल्या पीयूष देशपांडे याने येथे व्यक्त केले.
येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पीयूष देशपांडेचा आज, गुरुवारी महाविद्यालयाच्या सभागृहात प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी तो म्हणाला, लैंगिकता या विषयावर बोलणेही टाळले जाते, पण हा विषय कुटुंबातच सुसंवाद साधून पारदर्शकपणे मांडला गेल्यास वैचारिक मागासलेपण दूर होऊ शकते. आपल्यातील मरगळ झटकून पुढे जाणे हे काळाचे मर्म आहे. तरुणांना आपले उत्स्फूर्त आणि उत्कट विचार व्यक्त करण्यासाठी ‘लोकसत्ता’ने दिलेल्या संधीबद्दल आपण कायम ऋणी राहू.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.जे. चौधरी यांच्या हस्ते ७ हजार रुपयांचा धनादेश, पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना ‘समलिंगी समानता’ या अग्रलेखावर त्यांची मते नोंदवण्याची संधी देण्यात आली होती. यावर विद्यार्थ्यांनी मांडलेल्या मतांपैकी पीयूष देशपांडेने मांडलेल्या विचारांना प्रथम पारितोषिक देण्यात आले. यावेळी डॉ.डी.जे.चौधरी म्हणाले, विचारशक्ती जागृत ठेवण्यासाठी वाचन आणि लिखाण अत्यंत गरजेचे आहे. स्वत:चे विचार लेखणीतून व्यक्त करण्यासाठी कस लागतो. ‘लोकसत्ता’ने विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला हा उपक्रम त्यांना वैचारिकदृष्टय़ा सक्षम करणारा आहे.
आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांला प्रथम पारितोषिक मिळाले, याचा आनंद आहे. विद्यार्थ्यांमधील चिंतनशीलता विकसित करण्यासाठी ब्लॉग बेंचर्सचा निश्चितपणे उपयोग होणार आहे. आपली प्रतिभा ओळखून त्याचा योग्य वापर करणे हे प्रत्येकाच्या हाती आहे. ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमाच्या अनुषंगाने महाविद्यालयातही असे उपक्रम राबवण्याची प्रेरणा मिळाल्याचे प्राचार्य डॉ.डी.जे. चौधरी म्हणाले.
सत्कार प्रसंगी महाविद्यालयाचे जिमखाना उपाध्यक्ष प्रा. एम.जे. देशमुख, विद्युत अभियांत्रिकीचे विभागप्रमुख प्रा. ए. एस. सिंदेकर, प्रा. व्ही.व्ही. विरूळकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन महाविद्यालयाचा विद्यार्थी श्रीश उखळकर याने केले, तर प्रशांत जाधव याने आभार मानले. विद्यार्थिनी ऐश्वर्या लोंढे आणि अदिती वानखडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.