सुनील धोपे मृत्यू प्रकरण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाशीम जिल्हय़ातील कारंजा लाड येथील सीमा सुरक्षा दलाचे जवान सुनील धोपे यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी सीमा सुरक्षा दलाचे  पाच अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारंजा पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तिसऱ्या दिवशीही धोपे कुटुंबीय आपल्या भूमिकेवर ठाम असून, त्यांनी पार्थिव स्वीकारण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला.

मेघालयातील शिलाँग येथे कामावर असताना धोपे यांचा १५ सप्टेंबर रोजी संशयास्पदरित्या मृत्यू झाला. धोपे यांनी १४ सप्टेंबरला दूरध्वनीवरून कुटुंबीयांशी बोलताना वरिष्ठांकडून आपल्या जीवाला धोका असल्याची माहिती दिली होती. दोन दिवस बंद पुकारल्यानंतर बुधवारी कारंजा शहर पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. वाशीम शहरात बुधवारी काही संघटनांनी बंद पुकारला होता.

दरम्यान, पालकमंत्री संजय राठोड यांनी धोपे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. धोपे यांच्या मृत्यूबाबत कुटुंबीयांकडून उपस्थित केलेल्या मुद्यांची चौकशी करून न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची माहिती घेतल्याचे पालकमंत्री राठोड यांनी सांगितले.

  • मृत्यूमागे घातपात असल्याचा आरोप करून कुटुंबीयांनी गेल्या तीन दिवसांपासून पार्थिव स्वीकारण्यास नकार दिला असून पार्थिव अमरावतीच्या शवागारात ठेवले आहे.
  • पत्नी सविता धोपे यांनी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी आत्महत्येचा इशारा दिला होता. सीमा सुरक्षा दलाच्या शिलाँग मुख्यालयाचे डीआयजी हिरासिंग बिश्ट, बीसी रामविलास मिना, रमेश सिंग, गोपाल सिंग, शिवसिंग यांच्यावर गुन्हा दाखल करून तो शिलाँग पोलिसांकडे वर्ग केला आहे.
  • दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीमा सुरक्षा दलाचे वरिष्ठ अधिकारी कारंजा व अमरावतीत तळ ठोकून आहेत.
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta crime news
First published on: 20-09-2018 at 01:34 IST