दोन गुन्ह्य़ातील सहभागाने विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह

मागील वर्षभरात चांगल्या कामगिरीमुळे चच्रेत आलेले पोलीस दलाच्या विश्वासार्हतेवर दोन घटनांमुळे प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. मोबाइल चोरून गोपीनाय क्रमांक बदलणाऱ्या टोळीशी स्थानिक गुन्हा शाखा व दरोडा प्रतिबंधक पथकातील पाच पोलिसांचाच थेट संबंध असल्याचे समोर आल्याने पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. आष्टीत सहकारी महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून पोलीस निरीक्षकासह एका कर्मचाऱ्यावर थेट अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला. दोन्ही घटना पोलीस प्रशासनाबाबत सर्वसामान्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या ठरल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वी शहरात मोबाइल चोरून त्याचे गोपनीय नंबर बदलणाऱ्या टोळीचा भांडाफोड स्थानिक गुन्हा शाखेने केला. मात्र, या प्रकरणाच्या चौकशीत काही दिवसांपूर्वी या टोळीला पकडून सोडून देण्यात आले होते. इतकेच नव्हे तर स्थानिक गुन्हा शाखा आणि दरोडा प्रतिबंधक शाखेतील पाच कर्मचारी या टोळीच्या थेट संपर्कात असल्याने या टोळीकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले. काही मोबाइलचे गोपनीय नंबर बदलून ते पोलीस कर्मचाऱ्यांनीही घेतल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक घनशाम पाळवदे यांनी चौकशी सुरू केली असून पोलीस अधीक्षकांनीही या प्रकरणाची दखल घेऊन चूक करणाऱ्यांना सोडणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

मागील आठवडय़ात आष्टी पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने सहकारी पोलीस निरीक्षक व अन्य एका पोलिसावर अत्याचार केल्याची तक्रार दाखल केल्याने न्यायालयाच्या निर्देशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंधरा दिवसांपूर्वी पोलीस महानिरीक्षकांच्या पोलीस दरबारात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या छळाबाबत तक्रारी करताना अनेक महिला कर्मचाऱ्यांचा अश्रूंचा बांध फुटला होता.

‘मोबाइल चोरी प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलीस खात्यातीलच पाच कर्मचाऱ्यांचा यात सहभाग असल्याचा दिसून येत असल्याने वरिष्ठांना याची माहिती दिली आहे. दोषींवर कारवाई केली जाईल.’ -घनशाम पाळवदे, पोलीस निरीक्षक