स्वत:च्या आठ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम पित्यास भोकर जिल्हासत्र न्यायालयाचे न्या. एम. एस. शेख यांनी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा शुक्रवारी सुनावली.

भोकर शहरातील शासकीय रुग्णालयाजवळ असलेल्या तुकडोजी नगरमधील एका आठ वर्षीय स्वत:च्या मुलीवर पित्याने शेतात बलात्कार केला तसेच याबाबतीत कुणाला सांगितल्यास पाण्यात टाकून जिवे मारण्याची धमकी दिली. या गंभीर प्रकरणाची तक्रार मुलीच्या आईने पोलिसात दिल्याने १ सप्टेंबर २०१७ रोजी आरोपीविरुद्ध भोकर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक दतात्रय वाळके, पोलीस निरीक्षक आर. एस. पडवळ, पोलीस उपनिरीक्षक सुशील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पूनम सूर्यवंशी यांनी करून भोकर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

पीडित मुलीचा जबाब, वैद्यकीय अहवाल ग्रा धरून जिल्हा सत्र न्यायालायाने राक्षसी कृत्य करून माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आरोपी पित्यास दुहेरी जन्मठेप व २४ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे अ‍ॅड. ए. आर. कस्तुरे यांनी बाजू मांडली. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्यां आहिल्याबाई जाधव, पोलीस जमादार नामदेव जाधव, एस. आर. चव्हाण, उद्धव कांबळे यांनी सहकार्य केले.