सात जातपंचांवर गुन्हा

एका तरुणाने त्याच्याच समाजातील घटस्फोटित महिलेस आश्रय दिला म्हणून त्या तरुणाला व त्याच्या घरातील सदस्यांना त्यांच्याच  पंचांनी  सहा वर्षांपासून बहिष्कृत केले .अंनिसच्या रजनी गवांदे यांच्या प्रयत्नातून लोणी पोलिस ठाण्यात वाघवाल्या समाजातील ७ पंचांवर  शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयेशा अली शेख (रा. बाभळेशवर)हिचा  विवाह नारायणगाव येथील पापा शेख याच्या बरोबर झाला होता. सदर व्यक्तीने छळ करून तिला  घरातून हाकलून दिले नंतर जातपंचायतीत दंड भरून  तलाक दिला. त्यानंतर  तिचा  विवाह अली शेख याच्या बरोबर झाला.  घटस्फमेटित म्हणून तिला कोणीही आश्रय दिला तर त्याच्या कुटुंबासही समाजातून बहिष्कृत करण्यात येईल, असे सांगण्यात आले असताना लोहगाव येथील अली शेख या तरुणाने तिला आश्रय दिला होता. त्यास जातपंच बाबन रहेमान पठाण, हबिब दगडू पठाण, बक्षण गुलाब पठाण (रा.प्रवरानगर), सय्या हुसेन शेख, (रा. प्रवरानगर कोल्हार रोड), उस्माण हज्जुभाई पठाण, (रा. लोहगाव), गफुर बालम पठाण (रा. बाभळेश्वर) यांनी त्या दोघांना बहिष्कृत केले. त्यासाठी त्यांना पंचांनी  दीड लाख रुपयांचा दंड ठोठावला  आहे.  जात पंचायतीने घटस्फोटित महिलेस आश्रय देणाऱ्या तरुणास जिवंत असताना मृत घोषित करून त्यांच्या घरच्यांना दहावा, तेरावा घालायला लावला.  त्याला समाजातील कोणत्याही आनंदाच्या अथवा दु:खाच्या क्षणाला बोलवायचे नाही. म्हणून अशी शिक्षा पंचांनी ठोठावली.  घटस्फोटित महिलेच्या आजीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. तिला त्या कार्यक्रमातून या पंचांनी हाकलेले होते. त्यानंतर त्या तरुणाने त्या महिलेशी विवाह केला. त्यास पंचांनी राहत्या गावातून हाकलून दिले. त्यांच्याकडून खंडणी गोळा करण्याचे काम या पंचानी केले आहे.

या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून लोणी पोलिसांनी जातपंचायतीच्या सात जणांवर लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.